लासलगाव –कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात सर्वत्र अनलॉक होत असताना चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथे अशीच एक घटना घडली आहे. पोलीस असल्याचे बतावणी करत लासलगाव येथून दोघे भामट्यांनी साडेसात तोळे सोन्याची दागिने रहदारीचा असलेल्या कोटमगाव रोड वरून लंपास केली. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेमुळे लासलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,लासलगाव येथील सुलोचना विजय कोचर या वयोवृद्ध ६५ वर्षीय महिला घरातील कामानिमित्त बाहेर पडल्या. त्यानंतर कोटमगाव रोड वरील जाधव गॅस एजन्सी जवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञात भामट्याने पोलीस असल्याचे बतावणी केली. यावेळी त्यांनी दररोज चोरीच्या घटना घडत असून याबाबत टीव्हीवरही दाखवली जात असताना तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सोने घालून का घरा बाहेर आल्या असे सांगितले.यावेळी या भामट्यांनी तुमच्याकडे असलेल्या पिशवीत सोने काढून ठेवा असे सांगितले. त्यावेळी या अज्ञात व्यक्तीचा दुसरा साथीदार जवळ आला आणि त्या हातातली अंगठी काढून खिशात ठेव असे सांगितले. या साथीदाराने हातातली अंगठी काढून खिशात ठेवल्याने या महिलेला हा अज्ञात इसम पोलीस असल्याचे पटवून दिले. त्यानंतर महिलेने हातातील सोन्याच्या असलेल्या चार बांगड्या यापैकी एक बांगडी न निघाल्याने तीन बांगड्या आणि गळ्यातील मंगळसूत्र असा सव्वासात तोळे असलेला अंदाजे साडेतीन लाखांचा मुद्देमाल काढून पिशवीत ठेवले. यावेळी तुम्ही पिशवीत व्यवस्थित ठेवला आहे की नाही मी चेक करतो असे सांगत पिशवीतील सोने सुलोचना कोचर यांची दिशाभूल करत हातचालाखीने पिशवीतून काढून या दोघे भामट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली. सुलोचना कोचर या वयोवृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निफाड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे व पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके या दोघे अज्ञात चोरट्यांच्या तपासासाठी रवाना केल्या असून अधिक तपास लासलगाव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. व्ही. लाड करत आहेत.