लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासून १० दिवस बंद राहणार आहे. लासलगावसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या उद्यापासून दिवाळी निमित्त बंद राहणार आहेत. मात्र, लासलगावला सलग १० दिवस कांद्याचे लिलाव होणार नसल्याने त्याचा मोठा परिणाम देशात जाणवण्याची चिन्हे आहेत. कारण, १० दिवस देशभरात कांद्याचा पुरवठा होऊ शकणार नाही. परिणामी, कांद्याचे किरकोळ बाजारातील दर वधारण्याची शक्यता आहे.
लासलगाव बाजार पेठेतूनच देशभरात कांद्याचा पुरवठा केला जातो. यंदा अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक अडचणीत आहेत. त्यातच परतीच्या पावसानेही धुमाकूळ घातल्याने कांदा चाळीत ठेवलेला उन्हाळी कांदाही खराब झाला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कांद्याच्या आवकेवर परिणाम होऊ शकतो. त्यातच आता दिवाळीनिमित्त लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सलग १० दिवस बंद राहणार आहे.
दिवाळीमुळे व्यापा-यांच्या खळ्यावरील कामगार गावी जात असल्याने बाजार समितीत होणारे लिलाव बंद राहतात. त्यामुळे उद्या पासून जिल्हातील सर्वच चौदा बाजार समिती व उपबाजार समितीना जवळपास दहा सुट्टी राहणार आहे. त्यामुळे शेतक-यांना कांदा विक्रीसाठी आता दहा दिवस थांबावे लागणार आहे. लासलगाव बाजार समितीत उद्या म्हणजेच शनिवार पासून ते ३० ऑक्टोंबर रविवार पर्यंत कांदा लिलाव बंद राहतील तर उद्या पासून पाच दिवस धान्य भुसार मालाचे लिलाव बंद राहणार असल्याच बाजार समितीच्या सचिवांनी सांगितले आहे.
Lasalgaon Onion Market 10 Day Holiday