हितेश देसाई
लासलगाव – लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे यापुर्वी झालेले सिमांकन योग्य असून शेतकरी खरेदी देण्याच्या मानसिकतेत आहे. उर्वरीत शेतकऱ्यांचे भूसंपादन करण्याचा अधिकार भूसंपादन अधिकाऱ्यांना आहे. तरी देखील हा सिमांकन बदलण्याचा अट्टहास कशासाठी ? असा सवाल होत असून सध्याचे सिमांकन बदलून नवीन सिमांकनाची प्रक्रीया सुरु झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.लासलगावातील रहदारीची समस्या व अपघात टाळण्यासाठी गेल्या सोळा ते सतरा वर्षांपासून लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम सुरु आहे. सदर प्रकल्पाच्या भूसंपादनाचे तीन टप्पे करण्यात आले होते. यापैकी दोन टप्प्यांचे भूसंपादन व रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाची मोजणी, सिमांकन, शोध अहवाल, मुल्यांकन आदी प्रकारच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. भूसंपादन करुन रस्त्याच्या कामास सुरुवात करणे एवढेच काम बाकी आहे. असे असतांना भूसंपादन अधिकाऱ्यांनी अचानक युटर्न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मान्य नसल्याचे कारण देत नवीन सिंमंकानाची प्रक्रिया भूसंपादन अधिकारी व सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्या समन्वयाने सुरू करणार असा आशय असलेले वृत्त निफाडच्या प्रांताधिकारी डॉ अर्चना पठारे यांच्या नावाने वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.वस्तुस्थिती मात्र वेगळीच असल्याचे शेेतकऱ्यांचे म्हणणे आहे.शेतकऱ्यांनी आजवर कधीही प्रकल्पास विरोध केलेला नाही. अधिकारी व शेतकऱ्यांची अधिकृत बैठकच झालेली नाही.शेतकऱ्यांना दरच माहित नसल्याने मोबदला मान्य नसल्याचा प्रश्नच येत नाही. याच प्रकल्पातील मागील शेतकऱ्यांवर झालेला अन्याय लक्षात घेता पुन्हा तसला प्रकार होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी ना. भुजबळांना साकडे घातले होते.तेव्हा ना.भुजबळांनी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले होते. सिमांकन बदलण्याचे नाही. तसेच जिल्हाधिकारी साहेब प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.व न्यायाची मागणी केली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी असता सकारात्मक चर्चा झाली होती. या व्यतीरिक्त शेतकऱ्यांच्या वतीने कधीही तीव्र विरोध झालेला नाही.बरेच शेतकरी खरेदी देण्याच्या मानसिकतेत आहे. उर्वरीत शेतकऱ्यांचे भूसंपादन करण्याचा अधिकार भूसंपादन अधिकाऱ्यांना आहे. तरी देखील हा सिमांकन बदलण्याचा अट्टहास कशासाठी ? सिमांकन बदलले तरी तेथील शेतकरी योग्य दर मागणार नाही का? तसेच तांत्रिक अडचणी येऊन अपघात वाढणार नाही का ? अवघे एक कि.मी.चे. कामात या अगोदर देखील दोन वेळेस तांत्रिक अडचणीचे कारण देत सिमांकन बदलण्यात आले होते.आता अजून किती वेळेस सिमांकन बदलणार आणि रस्ता अस्तित्वात येणार तरी कधी ? असा प्रश्न शेतकरी व नागरीकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
कुठलाही बदल करु नये
येवला लासलगाव मतदार संघाचे भाग्यविधाते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.भुजबळ साहेब हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. साहेबांनी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. सिमांकन बदलण्याचे नाही. सिमांकन बदलल्यास लासलगाव बाह्य वळण रस्ता अपघात प्रणव क्षेत्र होईल.त्यामुळे सिमांकन जैसे थे ठेवावे.त्यात कुठलाही बदल करु नये.
जयदत्त होळकर (सरपंच, लासलगाव)
……
नवीन सिमांकनाचा अट्टहास का ?
जिल्हाधिकारी साहेब यांनी पाहणी केली पण प्रत्यक्ष लाभार्थी शेतकऱ्यांची याबाबत चर्चा केली नाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संमती दर्शवली असताना अधिकारी स्तरावर नवीन सीमांकन का होत आहे हे लक्षात येत नाही. सर्व शेतकरी वर्गाचे संमती पत्रावर यापूर्वी स्वाक्षरी घेतलेली आहे केवळ एकदोन व्यक्तीसाठी यास हरकत आहे. पालक मंत्री नामदार भुजबळ साहेब यांनी विश्वासात घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिलेल्या असतानाही नवीन सिमांकनाचा अट्टहास का ?
ज्ञानेश्वर पाटील (लाभार्थी शेतकरी,लासलगाव)