लासलगाव – शहराला गेल्या बारा ते पंधरा दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने लासलगाव ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा जगताप, संगीता पाटील, ज्योती निकम, आश्विनी बर्डे, दत्ता पाटील, अमोल थॊरे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिलांनी हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायतीचा निषेध केला. कोण म्हणत देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही, पाणी द्या नाही तर खुर्च्या खाली करा, सत्ताधाऱ्यांनो जागे व्हा गावकऱ्यांना पाणी द्या अशा आवेशपूर्ण घोषणांसह परिसर चांगलाच दणाणून गेला.
गेल्या १५ दिवसापासून सर्व प्रभागामध्ये पाणी पुरवठा झालेला नाही. ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे जनता वेठीस धरली जात आहे. लासलगाव येथे १६ गाव पणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. परंतु ग्रामपंचायतीकडून सातत्याने पाईप लाईन फुटली आहे. लाईट नाही असे शुल्लक कारण देवून जनतेची दिशाभूल केली जात आहे पाणी प्रश्नाविषयी विचारपूस केल्यास महिलांना तसेच नागरिकांना उडवा उडवीची उत्तरे ग्रामपंचायत कार्यालयातून दिली जातात तरी जो पर्यंत गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तो पर्यंत गावातील जनतेला टँकर मार्फत पाणीपुरवठा करण्यात यावा. १६ गाव पाणी पूरवठेची नवीन पाईप लाईन होण्या साठी केंद्र सरकारकडून ८.५ कोटी व राज्य सरकार कडून ८.५ कोटी रुपये असे एकूण १७ कोटी रुपये मंजूर झालेले असून आता पर्यंत त्याचे काम सुरु झालेले नाही तरी गावकऱ्यांची गैरसोय लक्षात घेता त्या पाईप लाईनची लवकरात लवकर डागडुजी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच एक दिवस आड पाणीपुरवठा कसा करता येईल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यता सुवर्णा जगताप,संगीता पाटील, ज्योती निकम आदीं महिलांनी केली आहे
हंडा मोर्चाला अहिल्यादेवी चौकातून सुरवात होत ग्रामपालिका कार्यलयात सर्कल अधिकारी यांना निवेदन देत सांगता झाली यावेळी जि. प. सदस्य डी. के. जगताप,सुवर्णा जगताप,प्रकाश दायमा, प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य संगीता पाटील, दत्ता पाटील, अमोल थॊरे, स्मिता कुलकर्णी, ज्योती शिंदे, माई पाटील, योगिता शिंदे, योगिता झांबरे, अश्विनी बर्डे, रुपाली केदारे ,माधुरी लचके,सोनी कर्डीले,सुनीता थॊरे, शोभा कर्पे ,रंजना शिंदे, कविता लोहारकर, अश्विनी पाटील, राजेंद्र चाफेकर, मनीष चोपडा, भानुदास बकरे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.