लासलगाव – लासलगाव विंचूर सह १६ गाव पाणी योजनेची पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असतानाही समितीचा कार्यभार पहात असलेल्या निफाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे ही पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये व महिलांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याने ही योजना तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा लासलगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्वपक्षीय गाव बंद करण्याचा इशारा लासलगाव चे सरपंच जयदत्त होळकर यांनी दिला आहे.
लासलगाव विंचूर सह १६ गाव पाणीपुरवठा योजना ही नांदूर-मधमेश्वर बंधार्यावरून कार्यान्वित झालेली आहे. मात्र या योजनेची पाईपलाईन मोठ्या प्रमाणात जीर्ण झाल्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाण्याची गळती होत असल्याने थेट पाणीपुरवठा बंद करण्याची वेळ समितीवर आलेली आहे. या समितीची देखभाल सध्या निफाड पंचायत समिती कडे असून गट विकास अधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. दर आठवड्याला पाणी गळती होत असल्याने थेट पाणीपुरवठा बंद केला जात असतानाही गट विकास अधिकारी यांनी या योजनेकडे जातीने लक्ष घालत गरजेचे असतानाही त्याकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विविध ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना केला आहे. या योजनेत समाविष्ट गावांपैकी फक्त लासलगाव सह मोजक्याच ग्रामपंचायतीचे कर्मचारी व प्रशासन या योजनेवर लक्ष ठेवून असल्याने पाणीपुरवठा सुरळीत प्रयत्न केला जात आहे.
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून या पाणीपुरवठा योजनेस दुरुस्ती कामी १७ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे मात्र हे काम होण्यास अजूनही अवधी लागण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत मोडकळीस व शेवटच्या घटका मोजणाऱ्या या पाणी योजनेची देखभाल करून पाणीपुरवठा सुरळीत करणे देखील प्रशासनाचे काम असताना निफाड पंचायत समिती च्या दुर्लक्षामुळे समाविष्ट गावातील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे. या पाणी योजनेचा बंद पडलेला पाणीपुरवठा तातडीने सुरु करावा व पाईपलाईन दुरुस्ती युद्धपातळीवर करावे अन्यथा लासलगाव ग्रामस्थांच्यावतीने सर्वपक्षीय गाव बंद करण्यात येणार असल्याची माहिती लासलगाव चे सरपंच जयदत्त होळकर यांनी दिली आहे.
पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची ही आहेत प्रमुख कारणे…
– पाणी पुरवठा योजना सुमारे २५ वर्ष जुनी असल्याने पाईप लाईन पूर्णतः जीर्ण झाली आहे.
– ठिकठिकाणी ही पाईपलाईन फुटत असते त्याचे लिकेज काढण्याचे काम युद्ध पातळीवर केले जाते.
– नांदूर मधमेश्वर येथे अनेकदा विजेचा लपंडाव सुरू असल्याने पाणी पुरवठा सुरू होऊनही नागरिकांना पाणी देता येत नाही.