लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सौ सुवर्णा जगताप यांचे आवाहन
लासलगाव – लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ सुवर्णा जगताप यांनी आज शेतकरी वर्गाकरीता शेतीमालाचे लिलाव बंद कालावधीत यांनी व्यापारी वर्गाशी संपर्क साधुन शेतीमालाची खरेदी विक्री करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत पत्रकारांना दिलेल्या निवेदनात सभापती जगताप यांनी म्हटले आहे की, सर्व संबंधित शेतकरी बांधव व इतर मार्केट घटकांना जिल्हाधिकारी यांचेकडील दि. १०/०५/२०२१ चे आदेशान्वये व जिल्हा उपनिबंधक यांचेकडील दि. ११/०५/२०२१ चे परीपत्रकान्वये लासलगांव मुख्य बाजार आवारावरील सर्व शेतीमालाच्या लिलावाचे कामकाज बुधवार, दि. १३/०५/२०२१ ते रविवार, दि. २३/०५/२०२१ पर्यंत पुर्णतः बंद राहणार आहेत.
त्यामुळे या नमुद कालावधीत ज्या शेतकरी बांधवांना आपला शेतीमाल बाजार समितीच्या अनुज्ञप्तीधारक अडते / व्यापाऱ्यांना त्यांचे प्लॉटवर (खळ्यांवर) जाऊन विक्री करावयाचा असेल. अशा शेतकरी बांधवांनी संबंधित अडते / व्यापारी यांचेशी दूरध्वनी अथवा इतर माध्यमांद्वारे संपर्क साधुन आपला शेतीमाल विक्री करावा. सदर व्यापाऱ्यांच्या प्लॉटवर (खळ्यांवर) बाजार समितीचे अनुज्ञप्तीधारक हमाल व तोलणार यांचे समक्ष झालेल्या व्यवहारास बाजार समितीची अधिकृत मान्यता राहील. विक्री करावयाच्या शेतीमालाची प्रत पाहुन भाव निश्चित करण्यात यावा. जेणेकरून वजनमापाच्या वेळी वांधा निर्माण होणार नाही. ज्या शेतक-यास मालाचा भाव पसंत पडेल, असा माल विक्री केल्यानंतर बाजार समितीच्या अधिकृत तोलणाराकडुन काटापट्टी घेऊन त्याप्रमाणे संबंधित अडते / खरेदीदार यांचेकडुन अधिकृत हिशोबपावतीप्रमाणे शेतीमाल विक्रीची चुकवती रक्कम रोख स्वरूपात त्याच दिवशी घेण्याची जबाबदारी संबंधित मालधन्याची राहील. कोणत्याही शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल उधारीवर विक्री करू नये, केल्यास त्याची कोणतीही जबाबदारी बाजार समितीची राहणार नाही. असेही सभापती सुवर्णा जगताप यांनी स्पष्ट केले आहे.