लासलगाव – कोरोनाच्या काळात शासन प्रशासन दिवसरात्र काम करत असतांना सामाजिक संस्थांनी अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. संकटाच्या काळात विविध सामाजिक संस्था नागरिकांच्या मदतीला धावून आल्या त्यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण असल्याचे सांगत लासलगाव परिसरातील विविध विकासाची कामे मार्गी लावली जात असून नागरिकांच्या मागणीनुसार अधिक कामे मार्गी लावली जातील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव ते वाकी या २ कोटी ५० लक्ष रुपये निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. तसेच पिंपळगाव नजीक येथे अंजुमन तालीमुल कुरआन सामाजिक संस्था लासलगांव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पासंख्यांक विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व होतकरु मुलींना मोफत शिलाई मशिन वाटप करण्यात येत आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुंबई बाजार समितीचे संचालक तथा लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच जयदत्त होळकर, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, पिंपळगाव नजीकचे सरपंच काशिनाथ माळी, डॉ.श्रीकांत आवारे, उपसरपंच अफजल शेख,समिना मेमन, वेदिका होळकर, गुणवंत होळकर, रऊफ पटेल, संतोष ब्रम्हेचा, मंगेश गवळी,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अकबर शहा,ज्ञानेश्वर शेवाळे, रामनाथ शेजवळ, पांडुरंग राऊत सोहिल मोमीन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशात पूर्वी केवळ उच्च समाजातील नागरिकांना शिक्षणाचा अधिकार होता. त्यांच्या महिलांनाही देखील तो अधिकार नव्हता. हा अधिकार सर्व समाजातील घटकांना मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्यात त्यांना सावित्रीबाई फुले आणि फातिमा बी शेख यांची साथ मिळाली. महिलांना शिक्षण मिळण्यासाठी पहिली शाळा सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात सुरू केली. त्यामुळे महिला शिकल्या त्या आज विविध स्तरावर काम करत आहे. त्याचा प्रत्यय आज येत आहे. ज्यांनी समाजाला मार्ग दाखविला ती सर्व आपली दैवत असून या समाज सुधारकांच्या प्रतिमा आपल्या घरात लावून त्याचे पूजन करावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, अंजुमन तालीमुल कुरआन संस्था सामाजिक कार्यात अतिशय अग्रेसर राहून काम करत आहे. समाजातील गोरगरीब, गरजू महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना मोफत शिलाई मशीन देण्याचे काम केलं जातं आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. पहिल्या टप्प्यात लासलगाव परिसरातील ३१ गरजू मुलींना तीन महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून आज त्यांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे. संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात एकूण ७५ मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे हे अतिशय महत्वपूर्ण सामाजिक कार्य संस्था करत आहे.
ते म्हणाले की, लासलगाव परिसरात रेल्वे उड्डाणपूलासह विविध विकासाचे कामे मार्गी लावली जात असून आवश्यक असलेली अधिक कामे मार्गी लावली जातील. सोळागाव पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी साडेसोळा कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच या योजनेचे नूतनीकरण करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते कोरोना योध्यांचा सन्मान
कोरोना काळात अतिशय कर्तव्यदक्ष राहून कामकाज केलेल्या डॉक्टर असोसिएशन लासलगाव, प्रेस क्लब लासलगाव, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय पथक, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, लासलगाव पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, स्वच्छता कर्मचारी, समाजसेवक या कोरोना योध्याचा सन्मान पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला.