लासलगाव – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सदस्यपदी प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. कवी होळकर यांच्या निवडीने हा बहुमान नाशिक जिल्ह्याला प्रथमच मिळाला आहे.
फलटण ( सातारा ) येथे सत्तावीसावे विभागिय साहित्य संमेलन नुकतेच थाटात संपन्न झाले व संमेलनाला जोडूनच महाराष्ट्र साहित्य परिषदेची ( पुणे ) या आद्य संस्थेची बैठक कार्याध्यक्ष मिलींद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार व इतर वीस मान्यवर सदस्य बैठकीला उपस्थीत होते. सुरुवातीला अटीतटीच्या वाटणाऱ्या बैठकीत कवी प्रकाश होळकर यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. नाशिकला संपन्न झालेल्या संमेलनातील वादविवाद अजून सुरूच आहे. तेव्हा होळकर यांच्या निवडीने अधिक लक्ष वेधले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीच्या सदस्यपदी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी अलीकडेच होळकर यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी प्रकाश होळकर यांचे अभिनंदन केले आहे .