लासलगाव – लासलगाव जवळ पिंपळगाव परिसरात प्रेम प्रकरणाच्या वादातून दोन कुटुंबात वाद झाला. या वादातून प्रवीण रावळा जाधव या युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला असून तो गंभीर जखमी आहे. त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जाधवने तरुणीच्या घरी सोमवारी रात्रीच्या सुमारास जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप आहे. त्यानंतर तरुणीच्या भाऊ आणि दोघे साथीदार अशा एकूण तिघांनी प्रवीणवर हल्ला केला. या प्रकरणात लासलगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याप्रकरणी सीमा रावळा जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रथमेश कैलास सरोदे, शुभम कैलास सरोदे आणि दीपक अजय नवले या तिघांनी हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात तरुणीने सुध्दा तक्रार दिली आहे. त्यात आई आणि भावास शिवीगाळ दमदाटी केल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरुन लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे पुढील तपास करत आहे.