लासलगाव. – स्पर्धा परीक्षेत ध्येय आणि ध्यास ठेवल्यास यशाची उंची सहज गाठता येते असे प्रतिपादन निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी लासलगाव येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रसंगी पहिले पुष्प गुंफताना केले. लासलगाव येथील ग्रामपंचायत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात डॉक्टर अर्चना पठारे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ लासलगाव महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डाॅ. प्रतिभा जाधव व कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लासलगावचे ग्रामपंचायत सरपंच जयदत्त होळकर होते.
यावेळी प्रांत पठारे म्हणाल्या की, आयुष्यातील प्रसंग ध्येयपूर्तीसाठी उपयुक्त ठरतात, आपल्यास संधी शोधता आली पाहिजे, जिद्द आणि चिकाटी स्पर्धा परीक्षेसाठी पूरक आहे जीवनात “व्यस्त आणि मस्त” राहिलास ध्येयाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. स्पर्धा परीक्षा देताना नकारात्मक येऊ देऊ नका ध्येय गाठण्यासाठी पेटून उठण्याची वृत्ती अंगी बाळगा. लासलगाव महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डाॅ .प्रतिभा जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जीवनात ध्येय व ध्यास असला पाहिजे या परिस्थितीत समाज हसला तरी मागे वळू नका ,ध्येय प्राप्ती नंतर याच समाजाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे.
प्रश्न संवादाने सुटतात प्रश्नापासून दूर न जाता चांगली माणसे वाचायला शिका, यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही स्वतःला स्वतः मध्ये शोधा “गुगल “चा वापर अनाठाई करू नका असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.लासलगाव पोलीस ठाण्याचे राहुल वाघ यांनी विद्यार्थ्यांना आपण यश निश्चित गाठणार हे ध्येय उरी बाळगा पण यासाठी मोबाईल ला आपल्यापासून दूर ठेवा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.यावेळी लासलगाव सरपंच जयदत्त होळकर गुणवंत होळकर ,चंद्रशेखर होळकर, रामनाथ शेजवळ ,योगेश पाटील ,ज्ञानेश्वर पाटील ,संदीप पाटील ,गोकुळ पाटील, विजय होळकर ,प्रमोद पाटील, ललित दरेकर, सोनू शेजवळ, सोनू शेख दिपक गरुड, अंबादास होळकर यांच्यासह स्पर्धा परीक्षा मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
:
लासलगाव सरपंच जयदत्त होळकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा जास्तीत जास्त मार्ग अवलंबावा यासाठी कोणतीही कमी पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेणारे विद्यार्थी यांची पाहणी प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे यांनी केली व मोबाईल पासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन करून प्रश्नोत्तराच्या साह्याने परीक्षेसाठी येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय यावर चर्चा केली.