लासलगाव – लासलगाव आगारातील एसटी बसवर दोन अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याने बसचे नुकसान केले. या दगडफेकीत काच फुटली असून दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजता लासलगाव आगारची बस क्रमांक – MH40N8831 ही चालक- दादा रामभाऊ आहेर ववाहक- सचिन वाल्मिक गवळी हे ११ प्रवासी व चालक हे तेरा जण बसमध्ये असताना चांदवड ते लासलगाव मार्गावर धावत असताना पिरसाईबाबा थांब्याजवळ आली असता अज्ञात व्यक्तीने रा.प.बसवर दगड मारल्याने समोरील दर्शनी काच फोडली.
एसटी बसचा संप चालू असताना लासलगाव आगारातील २१० कर्मचा-यांपैकी २० कर्मचारी २९ तारखेला संपातून बाहेर पडले व कामावर रुजू झाले होते. त्यामुळे रोज २ फेऱ्या लासलगाव ते चांदवड व २ फेऱ्या लासलगाव ते निफाड अागर प्रमुख यांनी २९ नोव्हेंबर पासून सुरु केल्या होत्या. परंतु, आज मंगळवारी चांदवड वरून लासलगाव येणारी बस क्रमांक एम एच 40 एन- 8831 ह्या एसटी बस वर अज्ञात दोन व्यक्ती मोटारसायकलवर आले आणि एसटीच्या समोरून दगडफेक केली.सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. दगडफेक चांदवड पोलीस स्टेशन हद्दीत झाल्यामुळे डेपो मॅनेजर व कर्मचारी यांनी चांदवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधून सर्व माहिती दिली .