लासलगाव – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगार टोळीला लासलगाव पोलीसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून इंडिका कारसह १ लाख ३९ हजाराचा मुददेमाल जप्त केला आहे. मंगळवारी कोजागिरी पौर्णिमा व ईद सणाच्या निमित्ताने पोलिस शहरामध्ये पेट्रोलिंग करत असतांना ही मोठी कारवाई केली आहे. टाकळी विंचुर गांवचे हददीतून जाणाऱ्या विंचुर – प्रकाश राज्यमार्गावर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या फाटयाजवळ नाकाबंदी सुरु असतांना रोडने येणारी जाणारी वाहनांची तपासणी करतांना हे दरोडेखोर सापडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चांदवडकडून लासलगाकडे येणारी एक कार नाकाबंदी पासून काही अंतरावर थांबून त्यांचे ताब्यातील वाहन वळवून पुन्हा चांदवड बाजुकडे पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना पोलिसांना संशय आला. त्यानंतर नाकाबंदी ठिकाणी असलेले अधिकारी, अंमलदार यांनी कारला पळत जात थांबवले. त्यावेळी यातील सहा प्रवाशी वाहनाचे दरवाजे उघडून पळण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपुस केल्यानंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत त्यांचे नाव गांव सांगण्यास टाळाटाळ केली. पण, वाहनाची झडती घेतल्यानंतर टाटा कंपनीच्या इंडिका कार क्रमांक MH १२ MB ४०७१ या वाहनामध्ये दरोडा टाकण्याचे साहित्य साधने मिळुन आली. या प्रकरणात लासलगाव पोलीस स्टेशनला साबीर शब्बीर कुरेशी, सर्फराज बाबा शेख, कुर्बान इस्माईल शेख, सनीराज विलास ढोंकणे, सागर ऊर्फ संदिप सुरेश कांबळे, योगराज मोहन सोनवणे या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांचीचौकशी केल्यानंतर त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे या अगोदर श्रीरामपूर येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो.उप निरी. देविदास लाड हे करीत आहे.