लासलगाव – परिसरातील गावांमध्ये बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मागील वर्षी शेतकऱ्यांचा या महत्वाच्या पोळा सणावर कोरोनाचे सावट होते. या वर्षी सुद्धा काहीशी अशीच परिस्थिती असल्याने तसेच कांदा, टोमॅटो यासह अन्य शेतमालाला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असल्याने यावर्षी शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह दिसून आला.
शेतकर्याचा सखा,मित्र सर्जा-राजाचा पोळ्याचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. श्रावणी पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना आंघोळ घातली. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावले. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली, गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधले. या वेळी घरातील सुहासिनींनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दिला.त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान केले.
शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असली तरी वर्षातून एकदा येणारा हा सण बळीराजा मोठ्या उत्साहात साजरा करतो. यावर्षी कांद्यासह टोमॅटो तसेच अन्य शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे तरीही लासलगाव व परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी पोळ्याच्या सणा निमित्त आपल्या लाडक्या बैलजोडीला लागणारा साज खरेदी करून पोळा साजरा केला.