लासलगांव – येथील प्रसिद्ध साहित्यिक, वक्ता, एकपात्री कलाकार प्रा. डॉ. प्रतिभा जाधव यांना सोलापूर येथील प्रेरणा प्रतिष्ठानचा प्रतिष्ठित असा ‘कृतीशील शिक्षक राज्यपुरस्कार’ वरिष्ठ महाविद्यालयीन विभागातून शिक्षक दिनी जाहीर झाला आहे. प्रेरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जडे, इतर पदाधिकारी व निवड समितीने डॉ.प्रतिभा जाधव करत असलेल्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व शैक्षणिक नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांची दखल घेऊन सदर पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे. गेल्या ३० वर्षांची समृद्ध अशी परंपरा कृतिशील शिक्षक पुरस्कारास आहे.महाविद्यालयीन विभागातील पुरस्कार विभागातून प्रथमच हा पुरस्कार सुरू करण्यात आला व त्याच्या पहिल्या मानकरी होण्याचा सन्मान महाराष्ट्रातून डॉ.प्रतिभा जाधव यांना मिळाला आहे. कोरोना काळात सामाजिक कार्यक्रमांवरील निर्बंध शिथिल होताच सोलापूर येथे सदर पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे . सन्मानपत्र,सन्मानचिन्ह व पुस्तक संच असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.
डॉ. प्रतिभा जाधव यांची आतापर्यंत ६ पुस्तके प्रकाशित झालेली असून ‘नाटक: समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम’ या विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरणासाठी त्यांना सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत निमंत्रित करण्यात आलेले होते. त्याचबरोबर डॉ.जाधव करीत असलेल्या महिला सबलीकरण व युवा जनजागृतीच्या कार्याची दखल घेत ‘ग्लोबल बेस्ट सिटीझन ऑफ इंडिया अवॉर्ड -२०१८’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कारदेखील त्यांना सिंगापूर येथे प्रदान करण्यात आला आहे. मॉरिशस व सिंगापूर येथे डॉ. जाधव यांनी ‘मी जिजाऊ…’ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जीवनसंघर्ष डोळ्यांसमोर उभा करणारा “मी सावित्री जोतिबा फुले….” हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केलेला आहे. अभ्यासू व निर्भीड वक्ता म्हणून त्या महाराष्ट्राला परिचित आहेत.
देश व परदेशातही महिला सबलीकरण व युवा जगजागृतीसाठी वैचारिक प्रबोधन करणाऱ्या डॉ. जाधव इतिहासात होऊन गेलेल्या कर्तृत्ववान महिलांचा इतिहास व विचार मांडून समाजातील महिलांना निर्भीड, स्वावलंबी, आत्मनिर्भर व सबल बनवण्याचे कार्य करत आहेत. त्याचप्रमाणे के.इ.एम. हॉस्पिटलमधील अत्याचारित परिचारिका अरुणा शानबाग यांची करुण कहाणी दर्शविणारा हृदय हेलावून टाकणारा “मी अरुणा …” हा एकपात्रीदेखील त्या सादर करतात. यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सदर कृतिशील शिक्षक राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल नू. वि. प्रसारक संस्थेचे सचिव गोविंदराव होळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.