लासलगाव – लासलगाव शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने भविष्यात शाळा, महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रलंबित असलेल्या शिक्षक वर्गाचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने करावे असे आवाहन लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी केले. लासलगाव शहरातील शाळा महाविद्यालय सुरू करण्याकरिता परिसरातील परिसरातील विद्यालयांचे प्राचार्य मुख्याध्यापक लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सभागृहात सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयदत्त होळकर उपस्थित होते. यावेळी उपसरपंच अफजल शेख ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर होळकर, रामनाथ शेजवळ, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील डॉ शेळके, डॉ सुजित गुंजाळ,डॉ विजय केंगे, डॉ विकास चांदर आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.
ग्राम विकास अधिकारी शरद पाटील यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली व त्या अनुषंगाने शाळा सुरू करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याबाबत चर्चा करण्याचे आवाहन केले. बैठकीस उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर चर्चा करत शाळा सुरू करण्यासंदर्भात आपले विचार व्यक्त केले. सरपंच जयदत्त होळकर यांनी शाळा सुरू करण्यापूर्वी कोरोना बाधित रुग्ण संख्येबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. महिनाभरात एकही रुग्ण गावात नसल्यास शाळा सुरू करण्याबाबत शासनाचा आदेश असल्याने लासलगाव सारख्या मोठ्या शहरात सध्या लगेच शाळा सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाईन शाळा सुरू ठेवण्याचे संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, श्री महावीर जैन विद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय ,सरस्वती विद्यालय ,नॅशनल उर्दू हायस्कूल यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शहरातील विविध सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी प्रफुल कुलकर्णी, विलास खैरनार, पवन सानप, मयूर राऊत, रुपेश पवार यांचे बैठकीत सहकार्य लाभले