लासलगाव – बँकेचे कर्ज असतांना इंडिका कार परस्पर दुस-याला गहाण देऊन बँकची फसवणूक केल्याचा प्रकार लासलगाव पोलीसांनी उघडकीस आणला. या प्रकरणात पोलीसांनी गाडी बँकेच्या ताब्यात दिली असून पुढील कारवाई केली जात आहे.
याबाबत समजलेली हकीकत अशी की, नाशिकरोडच्या बापू नगर येथे राहणा-या रुबिका जॉन साठे या महिलेने वडाळा नाका येथील नाशिक जिल्हा महिला सहकारी बँककडून इंडिको कार विकत घेण्यासाठी हाय -परचेस कर्ज रुपये ५ लाख ६८ हजार २६२ रुपये घेऊन इंडिगो कार एम् एच् १५ एफ् व्ही १२०७ विकत घेतली होती. हप्ता भरत नसल्याने बँकेने महाराष्ट्र राज्य संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ नुसार उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांचेकडून जप्तीचे आदेश घेतले. त्यानंतर बँकेचे वसूली अधिकारी सदर महिलेच्या घरी वारंवार गेले. त्या महिलेकडे गाडी आढळून आली नाही. हप्ता भरण्यास सहकार्य केले नाही. त्यामुळे बँकेने सदर महिलेस जामीनदार असलेल्या व्यक्तींच्या पगारातून हप्ता वसूल करण्याचे आदेश देऊन कार्यवाहीस सुरुवात केली. जामीनदारांच्या पगारातून बँकेचे हप्ते कट होत असल्याने त्यांनी जिल्हा पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन गाडीचा शोध घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर पोलीस या गाडीचा शोध घेत होते. पण, ही गाडी लासलगाव पोलीसांनी शोधून काढली.
लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास विश्वनाथ लाड यांची १ जुलै २०२१ रोजी सरकारी वाहनावर वाहन चालक पो काँ पानसरे यांचेसह गस्त ड्युटी होती. आंबेडकर पुतळा ते रेल्वे टेशन भागातील एटीएम व बँक चेक करत असताना गाडी क्रमांक एम एच१५ व्ही एफ् १२०७ ओरिएन्टल बँक ते एलडीपी बँक परिसरात संशयास्पद रित्या फिरताना आढळून आली. त्यानंतर ही गाडी थांबून गाडीतील इसमांकडे विचारपूस केली असता त्यांच्या बोलण्यात सत्यता आढळून आली नाही. त्यांच्याकडे नमूद गाडी बाबत कागदपत्र मिळून न आल्याने सदर गाडी पोलीस स्टेशन आणण्यात आली.
त्या इसमांना गाडीचे कागदपत्र आणण्यास सांगितले असता त्यांनी कागदपत्रे हजर न दिल्याने पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या आरटीओ ॲप वरून सदर गाडीचे मूळ मालकाचा पत्ता शोधला घेण्यात आला. सदर गाडीचे आरसी बुकवर नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि नाशिकची नोंद असल्याने पोलिसांनी बँकेशी संपर्क केला. त्यांना बोलावून घेऊन चौकशी केली या सर्व प्रकरणाची सत्यता समोर आली. त्यानंतर कायदेशीर बाबी पूर्ण करून घेऊन कर्जदाराने बँकेस फसवण्याचा व गाडी परस्पर गहाण ठेवून गहाण ठेऊन फसविण्याचा कट उधळून लावला. सदरची गाडी कर्जदारा समक्ष बँकेच्या स्वाधीन करण्यात आली.