लासलगांव – येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर डाळींब लिलावाचा शुभारंभ बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
लासलगांवसह परीसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगांव, सिन्नर, कोपरगांव, राहुरी, राहाता, नेवासा, गंगाखेड, वैजापुर, कन्नड तालुक्यातील गावांमध्ये शेतक-यांनी डाळींब ह्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांना मालविक्रीची सोय व्हावी म्हणुन बाजार समितीतर्फे डाळींब लिलावास सुरूवात करण्यात आली. डाळींब उत्पादकांनी आपला माल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा. वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्यात येणार आहे. डाळींब खरेदीसाठी मोठ्या संख्येने खरेदीदार सहभागी होणार असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळण्यास मदत होईल असे सौ. जगताप यांनी शुभारंभ प्रसंगी सांगितले.
तसेच डाळींब खरेदीस इच्छुक असणा-या व्यापा-यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पुर्ण केल्यास तात्काळ परवाना देऊन पॅकींग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.
सुरूवातीस गोरख बुल्हे, रा. शिरसगांव लौकी ह्या शेतक-याचा मुहूर्ताचा डाळींब ५२०० रुपये प्रती क्रेटस् ह्या दराने अखलाख हाजी मोहम्मद जाबीर अन्सारी यांनी खरेदी केला. दिवसभरात ५१२ क्रेटची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी ४०० रुपये जास्तीत जास्त ५२०० रुपये सरासरी १८०० रुपये याप्रमाणे होते.
याप्रसंगी बाजार समितीचे सदस्य रमेश पालवे, सहसचिव पी. आर. कुमावत, सहाय्यक सचिव ए. डी. गायकवाड, लिलाव प्रमुख एस. डी. डचके, एच. वाय. सोनारे, डाळींब व्यापारी मुजम्मील अन्सारी, सैय्यद मोहसीन सैय्यद मुश्ताक, जिब्राईल नाईकवाडी, तौसीफ बागवान, तबरेज शेख, राजु सैय्यद, कौसीक बागवान, प्रभारी एस. एस. पवार व सचिन बैरागी यांचेसह शेतकरी, मदतनीस आदि उपस्थित होते.