लासलगाव – लासलगाव सह विविध ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांची वीज बिल थकबाकीच्या कारणाने वीज वितरण कंपनीने विद्युत कनेक्शन तोडले आहेत. त्यामुळे अनेक गावे रात्रीच्या वेळी पूर्णपणे अंधारात असल्याने या तोडलेल्या वीज कनेक्शनचा पुरवठा तातडीने सुरू करण्यात यावा अशी मागणी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांवरील पथदीपचे विद्युत बिल अनेक वर्षांपासून थकबाकीत आहे त्याच कारणाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचे रस्त्यावरील दिव्यांचे विद्युत कनेक्शन गेल्या दोन दिवसांपासून बंद करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक छोटी-मोठी गावे रात्रीच्या वेळी अंधारात आहेत.
लासलगाव शहरात देखील विद्युत कनेक्शन तोडण्यात आल्याने अनेक रस्ते व विविध भाग अंधारात असल्याने चोऱ्या वाढण्याची शक्यता आहे. अनेक नागरिकांना व पादचाऱ्यांना लाईट नसल्याने त्याचा त्रास होत आहे. लाईट नसल्याच्या कारणाने चोऱ्यांचे प्रमाण वाढणार असल्याने त्याचा ताण आपोआपच पोलिस यंत्रणेवर पडणारा असल्याने थकबाकीच्या नावाखाली केवळ रस्त्यावरील तोडलेले वीज कनेक्शन वीज वितरण कंपनीने तातडीने पूर्ववत करावी अशी मागणी जयदत्त होळकर यांनी भ्रमणध्वनीवरून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. त्यावर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांच्याशी चर्चा करून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.