लासलगांव- गेल्या अनेक वर्षांपासुन अमावस्येला बंद असलेल्या कांदा लिलावाबरोबरच प्रत्येक शनिवारी दिवसभर कांदा लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय मर्चन्टस् असोशिएशनच्या सभासदांनी घेतला असल्याची माहिती दि लासलगांव मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष व बाजार समितीचे व्यापारी सदस्य नंदकुमार डागा यांनी दिली.
सध्या बाजार समितीच्या बाजार आवारांवर उन्हाळ (रब्बी) कांदा विक्रीस येत असुन पुढील हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बांधवांना पैशांची आवश्यकता असल्याने अनेक शेतकरी बांधव त्यांचेकडील कांद्याची विक्री करणेसाठी घाई करीत आहे. परंतु गेल्या महिन्यात कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासनाच्या आदेशानुसार लासलगांव बाजार समितीतील कांदा लिलाव साधारणतः २४ दिवस बंद होते. त्यामुळे शेतकरी बांधवांची कांदा विक्रीची निकड विचारात घेऊन परीसरातील शेतकरी बांधवांबरोबरच लासलगांव बाजार समितीच्या गेल्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून लासलगांव मर्चन्टस् असोसिएशनच्या सभासदांनी अनेक दिवसांची परंपरा मोडीत काढीत येत्या अमावस्येपासुन प्रत्येक अमावस्येला सकाळच्या सत्रात व प्रत्येक शनिवारी दिवसभर कांदा लिलाव सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला असून शेतकरी बांधवांनी त्यांचा कांदा हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून वरील दिवशी विक्रीस आणावा असे आवाहन डागा यांनी केले आहे.

लासलगांव मर्चन्टस् असोशिएशनतर्फे सत्कार
ऐन पावसाळी हंगामात सोमवार ७ जून रोजी बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर ४९० ट्रॅक्टर व १,४४७ पिकअप अशा एकुण १,९३७ वाहनांमधून विक्रीस आलेल्या ३८,२९६क्विंटल कांद्याची लिलाव प्रक्रिया कमीत कमी वेळात पूर्ण केल्याबद्दल आज लासलगांव मर्चन्टस् असोसिएशनतर्फे सर्वात जास्त कांदा खरेदी करणार खरेदीदार राका एक्सपोर्टस्चे मालक ओमप्रकाश राका, आर. के. बी. इम्पेक्सचे प्रतिनिधी दत्तात्रय खाडे, पुजा सन्सचे मालक सौरभ जैन, श्री अमरनाथ ट्रेडींग कंपनीचे मालक अनिल बांगर, साईश्रध्दा ट्रेडींग कंपनीचे मालक रोशन माठा यांचेसह बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सचिव पदाचा पदभार स्विकारलेपासून गेल्या दोन वर्षात जास्तीत जास्त दिवस लिलावाचे कामकाज सुरू ठेवणेसाठी व्यापारी वर्गाशी वेळोवेळी समन्वय साधुन प्रयत्न केल्याबद्दल त्यांचेसह बाजार समितीचे सर्व लिलाव प्रमुख सुनिल डचके, कांदा लिलाव प्रमुख दत्तात्रय होळकर, कांदा लिलाव पुकारणार गुमास्ते कांतीलाल आंधळे व चांगदेव देवढे तसेच व्यापारी मदतनीस सचिन जोशी यांचा दि लासलगांव मर्चन्टस् असोशिएशनतर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बाजार समितीच्या लासलगांव मुख्य बाजार आवारावर कांदा हा शेतीमाल विक्रीस आणणा-या शेतकरी बांधवांना कमीत कमी वेळेत लिलाव व वजनमाप प्रक्रिया पुर्ण करून देणेसाठी भविष्यातही अनेक उपाययोजना करून बाजार समितीचे आशिया खंडातील नांवलौकीक वाढविणेसाठी लासलगांव मर्चन्टस् असोशिएशनचे सर्व सभासद प्रयत्नशील असुन त्यासाठी बाजार समितीच्या पदाधिका-यांसह लासलगांव येथील सर्व व्यावसाईक व नागरीकांनी राजकीय गट-तट विसरून “आपलं गांव आपली बाजार समिती” ही भावना रूजविण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन डागा यांनी केले आहे.
यावेळी बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप, भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, राज्य उपाध्यक्ष दिपक चोपडा, नाशिक शहराध्यक्ष व लासलगांव प्रकल्प प्रमुख अभय ब्रम्हेचा, लासलगांव जैन श्रावक संघाचे संघपती नितीनकुमार जैन व सचिव मनोज शिंगी, लासलगांव ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांचेसह कांदा व्यापारी मनोज जैन, बाळासाहेब दराडे, प्रवीण कदम, प्रफुल्लकुमार भंडारी, संतोष माठा, राहुल बरडीया, सुरेश खुर्दे, संदीप गोमासे, मनिष सारस्वत, शंकर काळे, भास्कर डोखळे, नाना कोकणे, बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, लेखापाल सुशिल वाढवणे, संदीप निकम, मनोज शेजवळ, गौरव निकम, वैभव वाघचौरे, गोरख विसे, रामदास गायकवाड, गणेश आहेर, सर्व व्यापारी मदतनीस आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.










