लासलगाव -लासलगाव शहरात सुरू असलेल्या अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी केलेल्या कारवाईनंतर स्थानिक पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली असून शहरातील संजयनगर येथील सुलतान शेख व टाकळी विंचूर संधाननगर येथील जितेंद्र अशोक पगारे,तसेच इंदिरानगर पिपळगाव नजिक येथील सुमन गांगुर्डे यांच्यावर छापे टाकून महाराष्ट्र दारू बंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येऊन १११ देशी दारूच्या बाटल्या जप्त करून ६६६० रु मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
लॉकडाउन सुरू झाल्यापासून लासलगाव व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैद्य दारूची विक्री सुरू होती याबाबत अनेक तक्रारी दाखल होऊनही स्थानिक पोलिस प्रशासनाने कुठलीच कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण होते.लासलगाव शहरात अवैध दारू विक्री चे अड्डे जोरात सुरू असल्याच्या बातम्या आज वर्तमानपत्रात प्रकाशित होताच गुरुवारी सायंकाळी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लासलगाव व परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. मात्र या कारवाई नंतर शुक्रवारी स्थानिक पोलिसांनी देखील या अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला असून लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे करणारे विरुद्ध अधिक कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.