लासलगाव – लासलगाव शहरात अवैध दारू विक्रीचे अड्डे संचारबंदीतही अगदी जोरात सुरू असल्याची बातमी प्रकाशित होताच सायंकाळी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लासलगाव व परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या ठिकाणी धाड मारण्यासाठी दाखल झाले. नवीन बाजार समितीच्या जवळपास साधारण १०० ते १५० बाटल्या कारवाईत जप्त केली असल्याची चर्चा आहे.
उत्पादन शुल्क विभागाने बाजारतळ परिसर,रेल्वे स्टेशन परिसरात पाहणी केली मात्र काय कारवाई झाली आणि किती मुद्देमाल जप्त झाला याबाबत अधिकृत माहिती दिली नाही.नाशिक उत्पादन शुल्क विभाग लासलगाव मध्ये येऊन कारवाई करते मात्र लासलगाव पोलीस स्टेशनकडून कारवाईला विलंब का होतो याबाबत लासलगावमध्ये चर्चा रंगली आहे.
लॉकडाउन सुरू झाल्यापासून लासलगाव व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैद्य दारूची विक्री सुरू होती याबाबत अनेक तक्रारी दाखल होऊनही पोलिस प्रशासनाने कुठलीच कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण होते.दरम्यान लासलगाव शहरात व परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री अडयावर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे
लासलगाव पोलीस कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर पाच ते सहा ठिकाणी अवैध दारू विक्रीचे छुपे अड्डे मात्र या संचारबंदी च्या काळातही जोरात सुरू आहेत. सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे दुकान उघडे असले की त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत असताना व नियमांकडे बोट दाखवून पोलीस खाक्या दाखवणारे पोलीस अवैध दारू विक्रेत्यांवर इतके मेहरबान का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात होता.याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच उत्पादन शुल्क विभागाने लासलगाव व परिसरात धाडी घातल्याने नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
बांधालागत कारवाई होणार कधी…..
लासलगाव शहरात व परिसरात अवैध दारू विक्री जोरात सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लासलगाव येथे अनेक ठिकाणी झाडाझडती केली. मात्र लासलगाव पोलीस लाईनला खेटून असलेल्या दारूविक्रीचा अड्ड्यावर मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई का केली नाही. अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.