लासलगांव – कोव्हीड संदर्भात शासनाने ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोमवार २४ मे पासून बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवरील तसेच खानगांव नजिक तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावरील सर्व शेतीमालाचे लिलाव सुरू होणार असल्याची माहिती लासलगांव बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्हाधिकारी यांनी १२ मे,ते २३ मे, २०२१ अखेर नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करून सर्व बाजार समित्यांचे शेतीमाल लिलावाचे कामकाज बंद केल्याने लासलगांव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांच्या लिलावाचे कामकाज हे या काळात बंद होते.सदरचे बंद असलेले शेतीमाल लिलावाचे कामकाज हे २४ मे पासुन पुर्ववत सुरू करणेसाठी जिल्हाधिकारी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या सचिवांची बैठक घेऊन काही अटी व शर्तींनुसार बाजार समित्यांमधील लिलावाचे कामकाज सुरू करणेबाबत सुचना दिलेल्या आहे.
सदर अटी व शर्तींनुसार बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारांवर दररोज ५०० शेतमाल वाहनांचेच लिलाव करण्यात येणार आहे. त्यानुसार लासलगांव मुख्य बाजार आवारावर कांदा शेतीमाल विक्रीसाठी 8446461726, 8446371726, धान्य शेतीमाल विक्रीसाठी 8446551726, फळे व भाजीपाला शेतीमाल विक्रीसाठी 8446011726, निफाड उपबाजार आवारावर कांदा शेतमाल विक्रीसाठी 9922848557, धान्य शेतीमाल विक्रीसाठी 8459307385, विंचुर उपबाजार आवारावर कांदा शेतीमाल विक्रीसाठी 7887613160, धान्य शेतीमाल विक्रीसाठी 8624932503 तर खानगांव नजिक तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर फळे व भाजीपाला शेतमाल विक्रीसाठी 8669303063 ह्या भ्रमणध्वनी क्रमांकांवर शेतकरी बांधवांनी आपले नांव व शेतमाल विक्रीची नोंदणी करावी. नोंदणी झालेनंतर शेतकरी बांधवांना आलेल्या एसएमएसद्वारे ज्या-त्या बाजार आवारावर आपल्या शेतीमालाची विक्री करावी.
बाजार समितीत शेतमाल विक्री करणेसाठी एका वाहनाबरोबर एक व्यक्ती व शेतमाल खरेदीसाठी एका पेढीचे एका प्रतिनिधीस प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी, व्यापारी, गुमास्ता, कामगार वर्ग यांनी प्रवेशद्वारावरच आपला स्वत:चा लगतचा कोरोना निगेटिव्ह अहवाल बाजार समितीच्या सेवकांना दाखविणे व त्याप्रमाणे बाजार आवारात सामाजिक अंतर ठेऊन मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे.तरी शेतकरी बांधवांसह सर्व संबंधित घटकांनी सदरच्या अटी व शर्तीचे पालन करून बाजार समितीच्या बाजार आवारांवर शेतीमाल विक्रीस आणावा व शासनास आणि बाजार समितीस सहकार्य करावे असे आवाहन सौ. जगताप यांनी केले आहे.