लासलगाव – कोरोनाने विक्राळ रूप धारण केल्यावर सरकारने दहावीची परीक्षा रद्द केली मात्र आता निकाल कसा जाहीर होणार ? शैक्षणिक प्रगतीचे काय ? व पुढील प्रवेशाबाबतच्या अडचणीचे काय, जून पर्यंत वाट पाहून परीक्षा घ्यायला हवी होती असेही काहींना वाटते, परंतु तेव्हाही कोरोना लाट गेली नाही तर ? यावर लासलगाव येथील जुनियर कॉलेज मधील वाणिज्य विभागातील प्राध्यापक प्रमोद शांतीलाल पलोड यांनी काही पर्याय दहावी व बारावीच्या दोन्ही वर्गांसाठी सुचवले आहे.
दरम्यान १० वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या बोर्डांच्या निर्णयाल हायकोर्टात आव्हान याचिका दाखल झाली आहे. या याचिकेनंतर कोर्टाने एसएससी, सीबीएसई, आयसीएसई व इंटरनॅशनल बोर्डसह सर्व प्रतिवाद्यांना बुधवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.दहावीच्या परिक्षेचा निकाल लावताना प्रत्येक बोर्ड वेगवेगळे सूत्र लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल त्यामुळे यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून योग्य मार्ग काढावा असेही याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे या परिक्षेचा विषय आता रडारवर आहे. त्यामुळे प्रा. पलोड यांनी सुचविलेले मुद्दे आता चर्चेचे ठरले आहे.
प्रा. पलोड यांचा ३३ वर्षेचा अनुभव आहे. त्यांनी पंधरा वेळा बोर्डात बारावीचे पेपर काढले, पेपर तपासणीस, मॉडरेटर म्हणून कामे केले, चीफ कंडक्टर म्हणून अनेकदा (केंद्र संचालक) म्हणून कामे केलीत. चांदवड, लासलगाव, निफाड येथे केंद्र संचालक म्हणून काम केले. बोर्ड ऑफ स्टडीज म्हणजे परीक्षा मंडळाचा सदस्य होते. सहा वर्षात अभ्यासक्रम ठरविणे, पुस्तक लिहिणे, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ठरविणे इत्यादी असंख्य कामे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळात सोबत त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांनी सुचवलेल्या या पर्यायाचा निश्चित विचार करायला हवा ….
१. विद्यार्थी परीक्षा देतो म्हणजे काय करतो ? मर्यादित वेळेत स्मरण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहितो.
२. यात लिहितो हे अत्यंत महत्त्वाचे आता हेच लिहिण्याचे काम त्याच्याकडून घरी बसून करून घेता येईल.
३. बहुतेक शाळा कॉलेजची दहावी/ बारावीचे मुले व्हाट्सअप ग्रुप वर आहे त्यामुळे नेटचा प्रश्न येणार नाही.
४.एका विशिष्ट आठवड्यात ( मे २०२१) विषय शिक्षकाने व्हाट्सअप वर साधारणपणे बोर्ड पॅटर्न प्रमाणे सर्व दीर्घोत्तरी डबल प्रश्न द्यावे. यात objectives मुळीच येणार नाही जर बोर्डाचे ७ प्रश्न असतील तर आत्ता १० द्यावे हे १०० मार्क यात प्रॅक्टिकल पण आले पाहिजे.
५. विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयासाठी एक लहान ५० पानी स्क्वायर बुक घेऊन त्यावर विषय शाळा बोर्डाचा नंबर टाकून द्यावा.
६. अशाप्रकारे सहा ते सात स्क्वायर बुक लिहून होतील बोर्डाची उत्तरपत्रिका ३२ पानांची सुद्धा असते.
७. लिहिलेले हे स्क्वायर बुक (उत्तर पत्रिका) विद्यार्थ्याने शाळा-कॉलेज सांगेल त्या एका विशिष्ट आठवड्यात कॉलेजच्या गेटवर ठेवलेल्या टेबलवर विषय निहाय जमा कराव्यात. याचे वेळापत्रक कॉलेज किंवा शाळा ठरवतील. गर्दी होऊ नये म्हणून नंबर प्रमाणे विभाजन करावे. तेथे शिपायाकडे असलेल्या रजिस्टर मध्ये जमा केल्याचे सही करावी. हे काम सोशल डिस्टन्स ,सॅनिटायझर इत्यादी सरकारी नियमाने होणार.
८. यात शंका अशी येईल की मुले कॉपी करतील स्वतःला लिहणार नाही अनुभवी शिक्षक हे बरोबर ओळखतात तसे मार्क कमी होतील हे अगोदरच सांगितले जाईल.
९. विषय शिक्षक ज्यांच्या पेपर तपासणीस म्हणून आगोदरच नेमणुका झाल्या आहेत ते पेपर(स्क्वायर बुक) ताब्यात घेऊन, तपासून, ओवरलुक करून मार्क द्यावेत व याद्या बोर्डाकडे पाठवाव्यात. माझ्या अनुभवाने मार्क एक सारखे येत नाही.
१०.थोडक्यात सहजपणे (फुकट)सर्व पास असेही होणार नाही हुशार मुले पण नाराज होणार नाही काही विद्यार्थी नापास पण होतील काही वह्या जमा करणार नाही ते नापास होतील त्यांनी परत मुदतीत वह्या जमा कराव्यात कमिटी स्थापन करून सविस्तर अंमलबजावणीचा कार्यक्रम तारखेनुसार होईल.