लासलगाव – एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच रासायनिक खतांच्या वाढत्या किमती तातडीने कमी कराव्यात व शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन निफाड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य शिवा पाटील सुराशे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना दिले असून कृषी मंत्र्यांनी देखील केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याशी तातडीने पत्रव्यवहार करून या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांची रविवारी निफाड पंचायत समिती माजी सभापती शिवा पाटील सुराशे, टाकळी विंचूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन ईश्वर शिंदे, कृषी मित्र दत्ता मापारी, किरण पवार यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असून शेतीमालाला व्यापारी व ग्राहक मिळत नसल्याने आपला शेतमाल फेकून देण्याची वेळ बळीराजावर आली आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता दुहेरी रासायनिक खते दरवाढीचा फटका बसणार असल्याने कृषी मंत्र्यांना निवेदन सादर करत विविध रासायनिक खतांच्या किमती वाढल्या जाणार असल्याने तातडीने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.
दादा भुसे यांनी देखील या निवेदनाची दखल घेत तातडीने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर व रासायनिक विभाग मंत्री सदानंद गौडा यांच्याशी तातडीने पत्रव्यवहार करत या संदर्भात पाठपुरावा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले.