सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती अशी ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीने राज्यातील ३०५ बाजार समितीमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. पणन संचालनालयाने बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर केली. मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत २०२१-२२ च्या कामगिरीच्या आधारावर ही वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. ही क्रमवारी निश्चित करतांना शेतक-यांच्या शेतमालाच्या व्रिक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत सुविधाम नुसार ३५ निकष व २०० गुणांच्या आधारे ही निवड केली. बाजार समितीच्या या यशात समिती मधील सर्वच घटकांचा मोलाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया बाजार समितीच्या सचिव नरेंद्र वाहडणे यांनी दिली आहे.