लासलगाव – राज्यासह देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाची दुसरी लाट आली आहे यात नाशिकनंतर निफाड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याने थेट कोरोना विषाणूचा कांद्याची नगरी लासलगावात शिरकाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने पुढील आठवड्यात १९ एप्रिल ते २५ एप्रिलपर्यंत कांदा आणि धान्य लिलावाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय लासलगाव व्यापारी असोसिएशनने घेतल्याचे मेसेज एका व्यापाऱ्यांने सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल केल्याने दुपारनंतर कांदा उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेमध्ये संभ्रम निर्माण झाला.
याबाबत आमचे प्रतिनिधीनी लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांच्याकडे विचारणा केली असतात व्यापारी असोसिएशनने अधिकृत कुठलेही पत्र प्राप्त झालेली नसून तसेच कांदा आणि धान्य लिलाव बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. तर कोरोना महामारी असल्याने कांदा आणि धान्य जीवनावश्यक वस्तूच्या यादीत असल्याने तीन दिवसांच्यावरती लिलावाचे कामकाज बंद ठेऊ नये अश्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहे. त्यामुळे कांदा आणि धान्य लिलावाचे कामकाज सुरळीत सुरू राहणार असल्याचा खुलासा बाजार समिती प्रशासनाने केला आहे.
उन्हाळा सुरू असून उन्हाची तीव्रता दररोज वाढत असल्याने शिल्लक असलेल्या लाल कांद्याला मोठा फटका बसत नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. दररोज लासलगावसह जिल्ह्यातील कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये ७ ते ९ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. आज सर्वसाधारण लाल कांद्याला ६००ते ७०० रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळत आहे. कांद्याचे बाजार भाव पाहता कांदा उत्पादक शेतकरी आपला लाल कांदा ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटलमागे तोट्यात विक्री करत आहे. त्यात ८दिवस कांदा लिलावाचे कामकाज बंद राहिल्यास लाखोंचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू राहणार असल्याने कांदा उत्पादकांचे जीव भांड्यात पडले.
लासलगाव बाजार समितीतील कांदा व धान्य लिलाव पुढील आठवडेभर बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र बाजार समितीतील कांदा व धान्य लिलाव सुरळीत सुरू राहणार असल्याचे बाजार समितीने सांगितले आहे. अनाधिकृत व्यक्तींकडून सोशल मीडियावर मेसेज वर विश्वास न ठेवता बाजार समितीकडून खातरजमा करावी किंवा अधिकृत बाजार समितीच्या मेसेजवर विश्वास ठेवण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी कांदा उत्पादकांना केले आहे.