इंडिया दर्पण विशेष लेखमाला
जगातले सर्वांत मोठे मंदिर -८
नटराज मंदिर चिदम्बरम!
(क्षेत्रफळ १ ,६० ,००० स्क्वेअर मीटर)
जगातील सर्वांत मोठी मंदिरं या इंडिया दर्पण च्या विशेष लेखामालेत आज आपण तामिळनाडुतील विख्यात नटराज मंदिराची माहिती घेणार आहोत. तमिळनाडुच्या पूर्वेला चिदम्बरम येथे थिलाई नटराज मंदिर या नावाने हे स्थान विख्यात आहे. चिदम्बरम येथील शिव मंदिर शहराच्या मध्यभागी ४० एकर जागेवर म्हणजेच सुमारे १,६०,००० स्क्वेअर मीटर जागेवर हे मंदिर बांधलेले आहे.
तमिळनाडुत पंच महातत्वांपासून तयार झालेली पांच मोठी शिवमंदिर हजारो वर्षांपासून प्रसिद्ध आहेत.यांत चिदम्बरम येथील नटराज मंदिर जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णु यांचे अस्तित्व असल्याचे मानले जाते. पंच महा भूतांतील आकाश तत्वाच्या रुपांत शिवाने येथे वास्तव्य केलेले आहे. या मंदिरांतील स्फटिक शिवलिंग हे आकाशाचे प्रतिक समजले जाते.
तमिलनाडुच्या पूर्वेला चिदम्बरम येथे थिलाई नटराज मंदिर या नावाने हे स्थान विख्यात आहे. जगभरातील शैव पंथियांची ही दूसरी काशीच समजली जाते. संस्कृति आणि कला यांचा संगम येथे झालेला आहे. प्राचीन काळांतील पल्लव, चोला, पंडया विजयनगर आणि चेरा राजघराण्याच्या राजकर्त्यांनी हे मंदिर बांधले असून त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत. आनंद तांडव करणारे भगवान शिव येथे नटराजाच्या रुपांत पहायला आणि पुजायला मिळतात.
अति विशाल आणि वैभवशाली देवस्थान
चिदम्बरम येथील शिव मंदिर शहराच्या मध्यभागी ४० एकर जागेवर बांधलेलं आहे.भगवान शंकरांप्रमाणेच शिवकाशी अम्मान,गणेश, मुरुगण आणि विष्णु यांची भव्य मंदिर आहेत. येथील मुख्य मंदिराचे शिखर सोनेरी असून चोला राज्यकर्ते परान्तक याने इ.स. ९०७ ते ९५० च्या दरम्यान या मंदिरावर शिखर चढविले आहे.या मंदिराला राजराजा चोला प्रथम, कुलोथुगा चोला, तसेच कुन्दावाई द्वितीय, विक्रम चोला या राजांनी सदैव भरघोस दान केलेले असल्यामुळे दक्षिणेतील पद्मालय मंदिरापेक्षाही चिदम्बरम येथील नटराज मंदिर वैभवशाली आहे.
हे मंदिर केवळ प्रेक्षणीयच आहे असे नाही तर याची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. या मंदिराचे स्थान पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवावर आहे. पंच महा भूतांचे प्रतिनिधित्व करणारी कलाह्स्ती,कांचीपुरम आणि चिदम्बरम ही तीन मंदिरं एकाच सरळ रेषेत आहेत हाही एक अनोखा योगायोग आहे. या मंदिराला नऊ दरवाजे असून ती शरीरातील नऊ व्दाराचे प्रतीक मानले जाते. त्याचप्रमाणे २८ खांब ६४ बीम २१,६०० सोनेरी टाईल्स, ७२,००० सुवर्ण खिळे हे शरीरातील विविध भागांशी संबंधित अवयव आहेत. याच क्रमाने इथला पुढचा मंडप १८ खांबांचा असून तो १८ पुराणांचे प्रतिक समजला जातो. मंदिराला ९ दारं असून चार गोपुरं आहेत. ही गोपुरं सात मजली आहेत. या मंदिराची भव्यता,वास्तुकला आणि हजारो मुर्त्या हजारो वर्षांपासून सर्वांना प्रभावित करीत आहेत. विविध प्रकारच्या वास्तुकलेने चिदम्बरम मंदिर साकार करण्यात आले आहे.
मंदिर समुहाच्या मध्यभागी असलेल्या गर्भगृहात भगवान शिवाची नटराज मूर्ती आणि पार्वती (शिवाकामी) यांच्या मूर्ती आहेत. भगवान शंकराच्या मंदिरात दर्शन व पूजेसाठी सहसा शिवलिंग असते. चिदम्बरम येथे मात्र भगवान शंकर नटराजाच्या मानवी रुपांत नृत्य करतांना पहायला मिळतात हे दुर्मिल आहे. या भवनाला ‘चित्रसभा’ म्हणतात.याच्याच बाजूला ‘कनकसभा’ आहे.या दोन्ही सभा उंचावर आहेत. आतल्या प्राकारात नटराजाच्या नैॠत्येला गोविन्दराज पेरूमल यांचे मंदिर आहे.
येथील सर्वांत प्रमुख व पवित्र मंदिर चित्रसभा पूर्णपणे लाकडांपासून बनविलेले आहे. चित्रसभेचे सर्व खांबही लाकडी आहेत.चित्रसभेचे छत एखाद्या झोपड़ीसारखे दिसते.या सभेत नटराज आणि शिवाकामी यांच्या अरूप मूर्ती आहेत.यातील एक मूर्ती लाल रंगाच्या तर दूसरी मूर्ती काळया रंगाच्या पडद्या समोर आहेत.फक्त पूजेच्या वेळीच येथील दीपक लावतात.भगवान शिवाच्या उजव्या बाजूला चिदम्बर रहस्य म्हणजे ‘विल्व वृक्षाची पानं’ ठेवलेली आहेत. याच चित्रसभेत रत्नसभापती, चंद्रमौलिश्वराचे स्फटिक शिवलिंग,स्वर्णा कर्शान भैरावर, मुखालिंगम यांच्याही मूर्ती आहेत. चित्रसभेच्या अगदी समोर कनकसभा आहे.दोन्ही सभा उंचावर आहेत.मात्र चित्रसभा कनकसभेपेक्षा एक मीटर उंच आहे.येथे पांच पायर्या चढाव्या लागतात. पायर्या चढतांना पंचाक्षर मंत्र जपण्याची प्रथा आहे.
नटराज मंदिरा प्रमाणेच येथे नृत्य सभा आहे. या नृत्यसभेत भगवान शिवाची उर्ध्व तांडव मूर्ती आहे.या नृत्यात भगवान शिवाने देवी कालीवर विजय मिळविला होता. याच सभेत भगवान शिवाची सर्वेश्वर मूर्ती आहे. नृत्यसभा एखाद्या रथासारखी दिसते.या रथाला घोड़े जोडलेले आहेत. येथील देव सभेत सोमास्कंदर,पार्वती, विनायक,सुब्रमण्य आणि चंदिकेश्वर यांच्या पंचमूर्ती तसेच इतरही देवमूर्ती आहेत.दुसर्या प्राकारांत मुलान्थर रुपांत भगवान शिवाचे लिंग स्थापन केलेले आहे.
बाहेरच्या प्राकारात उजव्या बाजूला शिवकामी अम्मान देवीचे मंदिर, शिवगंगा तलाव आणि १००० खांबाचा सभा मंडपआहे. उत्सव काळात नटराजाची मूर्ती येथे आणतात.शिवकामी अम्मानचे भव्य मंदिर उजव्या बाजूला असून मुख्य मंडपाच्या छतावर नायक राज्यकर्त्यांच्या वेळी बनविलेली पेंटिंग पहायला मिळते.
मंदिराच्या भिंतीवर नर्तक,नगारे वादक,संगीतकार यांच्या प्रतिमा आहेत.येथील सर्वांत मोठे भवन रथासारखेच दिसते.याच्या प्रवेशव्दारावर दोन हत्ती आणि बाजूला अनेक नर्तक दिसतात. पंडया राज्यकर्त्यांच्या राजवटीत बनविलेले सुब्रमण्यम मंदिर प्राकाराबाहेर आहे. येथील भवन १०० स्तंभांचे आहे.सुब्रमण्यम मंदिरही रथाच्या आकारात बनविलेलेअसून यामंदिराला पंडया नायकम असेच म्हणतात.
चिदम्बरम मंदिराची चारी दिशांची गोपुरं अतिशय भव्य आणि सुंदर आहेत.प्रत्येक गोपुर २५० फूट उंच असून प्रत्येक गोपुराला सात मजले आहेत. मंदिराच्या पश्चिमेला सर्वांत प्राचीन स्तंभ असून या स्तंभावर नृत्यशास्त्रातील भरत नाट्यम या नृत्यप्रकाराच्या १०८ नृत्य मुद्रा दाखविलेल्या आहेत. मंदिरंतील खांबांवर हिंदू धर्माशी निगडित अनेक प्रसंग चित्र बनविलेली आहेत.प्रत्येक गोपुरंवर भगवान शिवाचे भिक्षाटन,कंकाल,कल्याणसुंदर,सोमास्कंदर आदि रूपं दखाविलेली आहेत.
मंदिराची वैशिष्ट्ये :
पेरुमटक्कनच्या पारंपरिक खानदानातील वास्तुनिर्मितीकाराकडून या मंदिराची उभारणी झाली. पल्लव, चोल राजांनी या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार केला.
४० एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रावर गेली एक हजार वर्षे हे मंदिर संकुल दिमाखात उभे आहे.
शैव आणि वैष्णव अशा दोन्ही पंथांचे, अर्थात भगवान शिव (नटराज) व भगवान विष्णू (गोविंदराज पेरुमल) यांना समर्पित असलेले हे मंदिर आहे.
भारतातील हे एकमेव असे शिवमंदिर आहे, की जेथे गाभाऱ्यात शिवलिंगाऐवजी महादेव भरतनाट्यम् नृत्यातील मुद्रेमध्ये दिसतात. नटराजाचे ब्रह्मांडीय नृत्य विश्वाच्या गतीचे प्रतीक आहे.
मंदिराला एकूण नऊ दरवाजे आहेत. त्यात चार दिशांना सात मजली उंच गोपुरे आहेत.
पूर्व गोपुरावर भरतनाट्यम् नृत्याच्या १०८ मुद्रा आहेत. हे गोपुर पल्लव राजा कोपेरुन्सिंगन याने १२४३ ते १२७९ या काळात पूर्ण केले. पश्चिम गोपुर जादववर्मन सुंदर पांड्यन याने १२५१ ते १२६८ या काळात पूर्ण केले. उत्तर गोपुर विजयनगरसम्राट राजा कृष्णदेवराय याने १५०९ ते १५२९ दरम्यान पूर्ण केले. दक्षिण गोपुर प्रथम राजा पंड्या याने बनविले. त्यावर पंड्या राजवंशाचे ‘मत्स्य’ हे प्रतीक दिसून येते. पल्लव राजा कोपेरुन्सिंगन याने इ. स. १२००मध्ये त्याची पुनर्निर्मिती केली.
मंदिरात पाच मुख्य मंडप आहेत.
पवित्र गाभाऱ्यात भगवान नटराज व त्याची सहचरी शिवाग्मासुंदरी विराजमान आहे. कनकसभा मंडप गाभाऱ्याच्या समोर असून, तेथे दैनिक संस्कार होतात.
नृत्य मंडप मंदिर ध्वजखांबाच्या दक्षिणेला असून, असे मानले जाते, की शिवाने येथे देवी कालीबरोबर नृत्य केले होते. सभामंडप हा एक हजार स्तंभ असलेला मंडप कमळ अथवा सहस्रराम नावाच्या योगिक चक्राचे प्रतीक समजला जातो. देवसभा मंडपात भगवान गणेश (विघ्नहर्ता), भगवान सोमास्कंद, देवाची सहचरी शिवनंदा नायकी, भगवान मुरुगा, भगवान चंडिकेश्वर या पाच मूर्ती विराजमान आहेत.
आनंद तांडव मुद्रा : शिवाची आनंद तांडव मुद्रा ही एक प्रसिद्ध मुद्रा असून, त्यातून पुढील अर्थ ध्वनित होतात.
– नटराजाच्या पायाखालील राक्षस हा अज्ञानाचे प्रतीक आहे.
– हातातील अग्नी वाईट गोष्टींचे निर्दालन करण्याचे प्रतीक आहे.
– त्यांचा उचललेला हात सर्व जिवांचे उद्धरण करण्यासाठी आहे.
– हातातील डमरू जीवन उत्पत्तीचे प्रतीक आहे.
-मंदिरामध्ये पाच परिक्रमा पथ आहेत.
मंदिराचे छत २१ हजार ६०० सुवर्ण कौलांनी शाकारलेले आहे.
चितसभेच्या वरील शिखरावर तांब्याचे नऊ कलश आहेत. गर्भागृह मानवी शरीरातील हृदयाप्रमाणे थोडेसे डावीकडे आहे.
अर्धमंडपातील सहा खांब सहा शास्त्रांचे प्रतीक आहेत. अर्ध मंडपाच्या बाजूकडील मंडपात १८ खांब असून, ते १८ पुराणांचे प्रतीक आहेत.
कनक सभेतून चितसभेत जाताना पाच पायऱ्या आहेत. त्या पंचाक्षरी मंत्रांचे प्रतीक आहेत.
चित सभेतील छत चार खांबांवर आधारलेले असून, ते चार वेदांचे प्रतीक आहेत.
चिदम्बरम मंदिरांत वर्षभर अनेक सण व उत्सव साजरे केले जातात. येथे भगवान शिवाची पूजा सहा प्रकारे केली जाते. संपूर्ण वर्षांत सहा वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात.त्या प्रत्येक प्रसंगी लाखो भाविक मंदिरांत येतात.
कसे जावे :
चिदम्बरम देशातील सर्ब प्रमुख शहरांशी रेल्वे आणि बस मार्गांनी जोडलेले आहे. त्रिचनापल्ली येथील विमानतळ चिदम्बरम पासून १२८ किमी अंतरावर आहे.
-विजय गोळेसर मोबाईल- ९४२२७६५२२९
Largest Temple 40 Acre Land 9 Doors By Vijay Golesar
Natraj Temple Chidambaram