नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांमध्ये हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये भूस्खलन, दरड कोसळण्याच्या घटना घडल्याचे आपण पाहात आहोत. हिमाचाल प्रदेश, उत्तराखंडापासून नेपाळपर्यंत भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. परंतु अशा घटना का घडत आहे, याबाबत तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे हे आपण जाणून घेऊयात.
फेब्रुवारी २०२० मध्ये नासाच्या एका अभ्यासात म्हटले आहे की, हवामान बदलामुळे हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी भूस्खलन होत आहे. नासाच्या वैज्ञानिकांनी उपग्रहाची छायाचित्रे आणि पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास करून अंदाज काढला आहे. त्यानुसार, हिमालयाच्या परिसरात पावसाच्या बदलत्या स्वरूपाने भूस्खलनात कशी वाढ होऊ शकते याबाबत अंदाज लावण्यात आला.
तापमानात सलग वाढ होत असल्याने चीन आणि नेपाळच्या सीमावर्ती परिसरात भूस्खलनाच्या घटना वाढू शकतात. या परिसरात विशेषतः हिमकडे आणि हिमकड्यांच्या तळ्यांच्या क्षेत्रात अधिक भूस्खलन होऊन पूराचे संकट निर्माण होऊ शकते. त्याचा परिणाम शेकडो किलोमीटर दूरवर होऊ शकतो.
घटनांत ७० टक्के वाढ
आशियाच्या सर्वात उंच पर्वतरांगा हिमालयापासून ते पश्चिमेला हिंदूकुश आणि तियान शान पर्वतरांगांपर्यंत पसरलेल्या आहेत. पृथ्वीच्या तापमानात वाढ होत असल्याने मॉन्सून पॅटर्न आणि पावसामध्येसुद्धा बदल होत आहे. आशियाच्या उंच पर्वतरांगांमधील पावसा-पाण्याचे स्वरूप बदलत आहे.
जून पासून सप्टेंबरपर्यंत मॉन्सूनदरम्यान मुसळधार पावासामुळे या परिसरात दरड कोसळण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. या अभ्यासात गेल्या अनेक वर्षांच्या डाटाचा अभ्यास करून दरड कोसळण्याच्या निष्कर्षांचे आकलन करण्यात आले. हवामान बदलामुळे भविष्यात सामान्यापेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. चीन आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात दरड कोसण्याच्या घटनांमध्ये ३० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.