नाशिक – गेल्या काही दिवसांपासून इतगपुरी तालुक्यात पावसाचा जोर आहे. त्याचा परिणाम कसारा घाटातील वाहतुकीवरही झाला आहे. इगतपुरी ते कसारा या दरम्यान असलेल्या घाटात आज पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आहे. याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आहे. इगतपुरी ते टिटवाळा रेल्वे दरम्यानची लोकल रेल्वेची वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. रेल्वे मार्गावरील दरड काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मध्ये रेल्वेवरील सर्व एक्सप्रेस आणि अन्य गाड्यांची वाहतूकही थांबली आहे. मुंबईहून मनमाडकडे जाणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. मुंबईतही पावसाचा जोर असल्याने अन्य गाड्या वळविण्यात आल्या आहेत. दरड काढण्याचे काम पूर्ण होताच वाहतूक पूर्ववत केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.