इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाला अनंत अंबानींनी आपल्या कुटुंबियांकडून २० किलो सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. ज्याची किंमत तब्बल १६ कोटी रुपये आहे. या मुकुटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजा मंडळाचे हे ९१ वे वर्ष आहे.
लालबागच्या राजाला यंदा मयूर महल केला आहे. यंदाची लालबागच्या राजाची मनमोहक अशी १४ फुटांची बाप्पाची मूर्ती यंदाच्या वर्षी मयूरासनावर विराजमान आहे. याच मुर्तीवर २० किलो सोन्याचा मुकूट असणार आहे.
यावर्षीच लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकारणीमध्ये उद्योजक अनंत अंबानी यांची कार्यकारी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर त्यांनी ही मोठी भेट दिली आहे. याअगोदरही अनंत अंबानी गेल्या १५ वर्षांपासून लालबागच्या राजाच्या मंडळाशी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून लालबागच्या राजाच्या मंडळाला विविध आरोग्य विषयक उपक्रमांसाठीही अंबानी कुटुंबीयांच्या वतीने मदत केली गेली आहे.
अनंत अंबानी यांनी २० किलो सोन्याचा आणि १६ कोटी रुपये किमतीचा मुकुट दिल्याची माहिती लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.