- पंडित दिनेश पंत
यंदा दिवाळीचा तिसरा दिवस हा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असा आहे. दोन्ही दिवस एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळेच या दोन्ही दिवसांचे महत्त्व आणि त्यांचे शुभमुहुर्त आपण जाणून घेणार आहोत.
नरक चतुर्दशीचे महत्त्व
लक्ष्मीपूजन अर्थात श्री महालक्ष्मी कुबेर पूजन हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आश्विन कृष्ण चतुर्दशी तिथी आहे. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्याने या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने अभ्यंगस्नान केले होते म्हणून आजच्या दिवशी पहाटे तेल उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याचा प्रघात आहे. घरातील स्वच्छतागृहे या ठिकाणीदेखील आज दिवा लावला जातो.
लक्ष्मीपूजनाचे साहित्य
श्रीलक्ष्मी- कुबेर प्रतिमा अथवा मूर्ती, सुट्टी फुले हार विड्याची पाने सुपारी हळकुंड कलश नारळ अक्षता नंदादीप अगरबत्ती कापूर निरंजन फुलवात लाह्या बत्तासे व महानैवेद्य इत्यादी.
असे करा लक्ष्मीपूजन
सायंकाळी श्री महालक्ष्मी कुबेर पूजन करताना गणपती मूर्ती, महालक्ष्मी मुर्ती, कुबेर, गजलक्ष्मी अर्थात हत्ती मूर्ती आणि सरस्वती या मूर्ती सोबतच कुलदेवता आपली गुरुमुर्ती यांची पूजा करावी. पूजा मांडताना पूजा करणाऱ्याचा चेहरा उत्तर दिशेकडे म्हणजेच कुबेराच्या दिशेकडे येईल, अशा पद्धतीने पूजा मांडावी. पूजेच्या दोन्ही बाजूला नंदादीप लावावेत. या सर्व मूर्ती भोवती फुले, हार, रंगीत रांगोळ्या व पणत्या यांची आरास करावी. मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आंब्याच्या पानांचे तोरण, दारात रांगोळ्या व पणत्या लावाव्यात.
पूजा सुरुवात करताना प्रारंभी गणपती पूजन करावे गणपती मूर्तीवर फुलाने पाणी शिंपडून हळद-कुंकू, अक्षता वाहाव्यात. त्यानंतर गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. महालक्ष्मी मंत्र श्री सूक्त यासोबतच ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ या महालक्ष्मी मंत्राचा १०८ वेळा जप करावा. सर्व पूजा मूर्तींवर फुलाने गुलाब पाणी शिंपडावे. गणपती आरती, देवीची आरती, कर्पूरारती, मंत्र पुष्पांजली म्हणावी. लाह्या, बत्तासे, फराळातील गोड पदार्थ, खीर, पेढे यांचा नैवेद्य दाखवावा. शंखध्वनी करून श्री महालक्ष्मी ला आवाहन करावे.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असा
महालक्ष्मी पूजनाचा मुहूर्त सायंकाळी ०६:०२ पासून ०८:३४ पर्यंत आहे.