मुंबई – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांवर झालेला हल्ला आणि त्यात ८ शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी आज (११ ऑक्टोबर) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारनेच महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारचे निष्काळजीपणामुळे निष्पाप शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचा निषेधार्थ हा बंद केला जाणार आहे.
नक्की काय काय बंद राहणार
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांसह विविध शेतकरी संघटना आणि संस्थांनीही महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यास मोठा प्रतिसाद मिळण्याची चिन्हे आहेत. अनेक शहरांमधील व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. मात्र, त्यासाठी दिवसभर दुकाने बंद ठेवण्याला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याने आता सणासुदीच्या काळात व्यापार बंद ठेवणे योग्य नाही. पण, घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे त्यास आमचा पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. राज्यभरातील कृषी उत्पन्न बातार समित्या, आठवडे बाजार, प्रमुख मार्केट, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदींबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे नक्की काय काय बंद राहणार हे आज दिवसभरातच स्पष्ट होणार आहे.