नवी दिल्ली- देशभरात गाजत असलेल्या लखीमपूरच्या दुदैवी घटनेचे पडसाद अद्याप उमटतच आहेत. त्यातच आता भाजप नेत्यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याच्या संदर्भात या पक्षातच मतभेद आहेत. कारण आता पक्षाचे नेते आणि माजी आमदार राम इक्बाल सिंह यांनी या प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपला हा घरचाच आहेर मिळाल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.
राम इक्बाल सिंग यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना लखीमपूर घटनेचे दोषी म्हणून संबोधले असून पंतप्रधान नरेंद्र मोदीं त्यांच्याकडे तक्रार करत मिश्रा यांना पक्षातून तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली. सिंह यांनी माध्यमांशी बोलताना लखीमपूर घटनेसाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना जबाबदार धरले आहे. सिंग पुढे म्हणाले की, गृह राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी होती, पण ते आपल्या मुलाच्या बचावामध्ये व्यस्त होते. गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना कारने चिरडले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच त्याला अटक करण्यात आली, परंतु मिश्रा अजूनही मंत्रिपदाच्या खुर्चीवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना तत्काळ बडतर्फ करावे. सरकारनेही शेतकऱ्यांची काळजी घ्यावी. सरकारच्या उदासीनतेमुळे राज्यभरातील शेतकरी व कामगार संतापले असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सिंग यांनी यापूर्वीही सरकारवर टीका केली आहे.