लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश)- येथील शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडण्याचा आरोप असलेला केंद्रीय गृहराज्यमंत्री पुत्र आशिष मिश्राला शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. बारा तास चौकशी केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. मध्यरात्री १२ वाजून ४८ मिनिटांनी त्याला कारागृहात पाठविण्यात आले. हत्येचा आरोपी असलेला आशिष मिश्रा चौकशीत सहकार्य करत नसल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे सरकारच्या विशेष पर्यवेक्षण समितीचे सदस्य डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांनी सांगितले.
येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात एसडीएमच्या उपस्थितीत आशिष मिश्राची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रात्री साडेबारा वाजता त्याला न्यायदंडाधिकार्यांच्या समोर हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याच्या तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली. आशिषच्या वकिलांनी कोठडीच्या मागणीला विरोध केला. न्यायदंडाधिकार्यांनी आशिषला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.
त्यापूर्वी शनिवारी सकाळी दहा वाजून ४० मिनिटांनी आशिष मिश्रा गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयासमोर अचानक दाखल झाला. त्याचे समर्थक त्याच्या वडिलांच्या कार्यालयाजवळ उपस्थित होते. आशिष मिश्रासोबत लखीमपूरचे आमदार योगेश वर्मा, अजय मिश्रा टेनींचे प्रतिनिधी अरविंद सिंह संजय आणि जितेंद्र सिंह जितू, पोलिसांच्या कार्यालयात दाखल झाले. डीआयजी उपेंद्र अग्रवाल कार्यालयात आधीपासूनच उपस्थित होते.
आशिष कार्यालयात दाखल झाल्यानंतर पोलिस आयुक्त विजय ढूल, अतिरिक्त पोलिस आयुक्त अरुणकुमार सिंह दाखल झाले. तसेच विशेष तपास समितीचे सदस्यही पोहोचले. त्यानंतर आशिषच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली. घटनास्थळी उपस्थित नव्हतो हेच आशिष चौकशीदरम्यान सांगत होता, असे सूत्रांनी सांगितले.