नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामजिकशास्त्रे विद्याशाखेचे प्र. संचालक आणि सावित्रीबाई फुले अध्यासनाचे समन्वयक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांना रविवार,२१ नोव्हेंबर २०२१ रोजी संपन्न झालेल्या ऑनलाईन समारंभात ‘लाडली मीडिया’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. दैनिक दिव्य मराठीच्या ‘मधुरिमा’ या साप्ताहिक पुरवणीत २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘फिरत्या चाकावरती’ या सदरासाठी हा पुरस्कार देण्यात आला. वाहन चालकाचा व्यवसाय करून आपली उपजीविका करणाऱ्या देशभरातल्या स्त्रियांच्या यशोदायी संघर्षकथा या सदरातून मांडण्यात आल्या आहेत. Population First, United Nation’s Population Forum आणि भारतातील नॉर्वेचे दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने लिंगभाव संवेदनशीलता निर्माण करणाऱ्या वार्तांकन आणि लेखनासाठी हे विविध वर्गवारीत हे पुरस्कार गेल्या १० वर्षांपासून देण्यात येतात. पुरस्काराचे यंदाचे हे ११ वे वर्ष असून यावर्षी १० भाषांमधल्या ९८ प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आलं आहे . या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे स्वतंत्र पत्रकार फेय डिसुझा होते तर United Nation’s Population Forum च्या श्रीराम हरिदास यांची विशेष उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. घोडेस्वार यांनी आयोजकांचे आभार मानले. दैनिक दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे, फिचर एडीटर प्रशांत पवार, विजय बुवा, श्री. पेठकर, मिनाज लाटकर आदींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे डॉ. प्रवीण घोडेस्वार यांचं हे पहिलंच सदर लेखन आहे. त्यांना याचवर्षी पत्र पंडित पा.वा. गाडगीळ पुरस्कार देखील जाहीर झाला आहे. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांच्या या यशाबद्दल मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इ.वायुनंदन, माजी संचालक आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. रमेश वरखेडे,कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि विद्यापीठातल्या सहकाऱ्यांनी अभिनंदन केलं आहे.