पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महिला सबलीकरणाकरीता राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास ३५ लाख माता-भगिनींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात ५० लाख महिलांच्या खात्यात लाभ जमा करण्याच्या प्रयत्न आहे. त्यामुळे महिलांच्या मनात समाधानाची भावना दिसून येत आहे. येत्या १७ ऑगस्ट रोजी बालेवाडी येथे या योजनेचा राज्यस्तरीय लाभ हस्तांरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुण्यात सिंहगड रोडवरील पुलाच्या उदघाटन सोहळ्यात बोलत असतांना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी १ कोटी २५ लाख महिलांच्या खात्यात महिनाअखेर पैसे देणार असल्याचेही सांगितले.
प्रक्रिया बुधवारपासून सुरू
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. राज्यात आतापर्यत १ कोटी ६४ लाख ४० हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील जवळपास १ कोटी ३६ लाख पात्र महिला आहेत. अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पात्र महिलेच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे. या योजने अंतर्गत अधिकाधिक माता-भगिनी पर्यंत सन्माननिधी वितरित करण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी काल सांगितले होते.