सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा १ हजार ५०० रुपयांची रक्कम वाढवत जावून टप्या-टप्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथील सोहळ्यात दिली.
सातारा जिल्ह्यातील सैनिक मैदानावर महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लाडक्या बहिणींशी संवाद साधला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व आमदार महेश शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दिपक चव्हाण तसेच महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, महिला बचत गट, कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांना ताकत द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली मला पाहायची असल्याचे आवर्जून सांगितले. आपल्या सगळ्यांचा प्रतिसाद पाहता यापुढे १७ ऑगस्ट हा दिन लाडकी बहीण दिवस म्हणून साजरा केला जाईल असेही याप्रसंगी जाहीर केले.
महिलांना पैसे कुठे आणि कसे खर्च करावे ते चांगले कळते. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेलच व यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करुन महिला लहान मोठे उद्योग सुरु करतील. राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ठरेल.