मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदांमध्ये ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतलेल्या कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतचे परिपत्रक ग्रामविकास विभागामार्फत जारी करण्यात आले आहे. सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठविलेल्या यादीमध्ये एकूण ११८३ नावे समाविष्ट असल्याचे म्हटले आहे. हे अधिकारी/कर्मचारी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत.
या परिपत्रकात जिल्हा परिषदा स्वयत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आहेत. त्यामुळे विषयांकीत प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमातंर्गत आवश्यक ती कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला व बाल विकास विभागास उपलब्ध करुन द्यावी व त्याची प्रत ग्राम विकास विभागास उपलब्ध करुन द्यावी असे आदेश देण्यात आले आहे.
या परिपत्रकात म्हटले आहे की, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या (DATA) अनुषंगाने जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला असलेल्या कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांची यादी महिला व बाल विकास विभागाने संदर्भाधीन पत्रान्वये पाठविली आहे. सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी/कर्मचारी पात्र नसताना सुध्दा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेवून शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमातंर्गत आवश्यक ती कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करणेबाबत सांगितले आहे.
