इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर येथे राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यांनी लाडकी बहिण योजनेतील डिसेंबर महिन्यातील १५०० रुपये अधिवेशन संपल्यानंतर खात्यात पाठवले जातील असे त्यांनी सांगितले.
या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते मिळाले असून सहावा हप्ता बाकी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, कोणतीही शंका मनात ठेवू नका, जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत. ज्या ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत. एकही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींना महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकणार आहोत. या योजनेचे निकष बदलले नाहीत असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत निवडणुका संपल्यानंतर ही योजना बंद केली जाईल असे सर्वांना वाटत होते. पण, आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही योजना सुरुच राहणार असल्याचे सांगितले. या योजनेतून २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीत दिले होते. पण, ही वाढीव रक्कम अर्थसंकल्पानंतर मिळणार असल्याचे बोलले जात आहे.