इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मथुरा-वृंदावन परिसरातील एका आखाड्याच्या प्रमुख महंतांकडून शहरातील कॉलेजच्या प्राध्यापिकेला अश्लील मेसेज पाठवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी महंतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. विशेष म्हणजे ही घटना ४ महिन्यापूर्वीची असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास खूप दिवस टाळाटाळ केली, असा आरोप या प्राध्यापिकेने केला आहे. मात्र या प्रकरणामुळे शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मथुरा-वृंदावन येथील एका कॉलेजच्या प्राध्यापिकेला २० मे रोजी रात्रीच्या वेळी अश्लील मेसेज आला. या संदर्भात तिने चौकशी केली असता, तो मेसेज मथुरा-वृंदावन भागातील चैतन्य कुटी येथील चतुः संप्रदायाचे प्रमुख महंत फूलडोल बिहारी दास यांच्या मोबाईलवरून आल्याचे समजले. यासंदर्भात त्या महिलेने जाब विचारला असता आखाड्याच्या साधु-महंतांनी त्या महिलेवरच उलट आरोप करत वादावादी सुरू केली.
ही प्राध्यापिका सामाजिक कार्यकर्ता असल्याने सामाजिक संघटनांनी या प्रकरणाविरुद्ध आवाज उठवत आखाड्याच्या साधू-महंतांविरुद्ध तातडीने चौकशी करावी अशी मागणी केली. त्यानंतर या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी तक्रार व गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली केवळ वेळ घालवल्याचा आरोप प्राध्यापिकेने केला आहे. यानंतर अनेक वेळा विनंती करणारे पत्र दिल्यानंतर, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असेही या प्राध्यापिकेने सांगितले.
मात्र आता हे प्रकरण चांगलेच तापले असून याप्रकरणी सदर महंतांची चौकशी सुरू आहे. महिलेला अश्लील फोटो पाठविण्यासंदर्भातील प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे सोपवण्यात आला आहे. याचा अहवाल आल्यानंतर, कारवाई करण्यात येईल, असे वृन्दावन पोलीस ठाण्याचे प्रमुखांनी सांगितले. दरम्यान, या महंतांने आपण हा मेसेज पाठवला नसून आखाड्यातीलच एका लहान मुलाकडून मोबाईल वरून हा मेसेज चुकीने पाठविल्या गेल्याची कबुली दिली आहे. तसेच याबद्दल खेदही व्यक्त केला आहे.
एकंदरीत या प्रकरणाची आता धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू आहे. वास्तविक चतुःसंप्रदाय आखाड्याबाबत अद्याप पर्यंत अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आल्या नव्हत्या. कारण या आखाड्याला प्रत्येक कुंभमेळ्यामध्ये अत्यंत मानाचे व महत्त्वाचे स्थान असते, असे म्हटले जाते.
Ladies Professor Mobile Message Molestation Sadhu
Crime Mathura Madhya Pradesh