मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोणाचे नशीब कधी पालटले जाईल हे सांगता येत नाही. नशीब अशी गोष्ट आहे, जी क्षणार्धात एखाद्याला गरीब, तर क्षणार्धात श्रीमंत बनवू शकते. अशा घटनांची अनेक उदाहरणे आहेत. असे एक उदाहरण पाहायला मिळाले आहे. ज्यामध्ये रोजंदारी मजुराचे नशीब चांगलेच फळफळले आणि तो रातोरात एक सुपर मॉडल झाला. ही गोष्ट आहे केरळमधील कोझिकोड येथे राहणाऱ्या ६० वर्षीय रोजंदारी मजूर मम्मिक्का यांची. त्यांचे नशीब इतके उजळले की ते मजुरावरून थेट मॉडल झाले. एका फोटोग्राफरचे मम्मिक्का यांच्यावर लक्ष गेले आणि त्यांनी मम्मिक्का यांचे नशीब क्षणार्धात पालटून टाकले.
मम्मिका यांचे वय ६० वर्षे आहे. ते रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. फोटोग्राफरने त्यांचा असा मेकओव्हर केला, की त्यांच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. मम्मिक्का यांनी एका स्थानिक कंपनीच्या प्रमोशनसाठी फोटोशूट केले होते. मम्मिका यांनी या फोटोशूटमध्ये एक रॉयल सूट परिधान केला आहे. त्यांच्या हातात आयपॅड दिसून येत आहे.
असे म्हणतात की देवाच्या हातात सर्व काही आहे. कोणाला तरी माध्यम बनवून तो घडवून आणतो. मम्मिक्का यांच्याबाबतीतही असेच घडले. त्याचे सर्व श्रेय त्या फोटोग्राफरला जाते. शारिक वायलिल असे त्या फोटोग्राफरचे नाव आहे. शारिक यांनी रोजंदारी करणाऱ्या मजुरामध्ये मॉडेलिंगचे गुण ओळखले. शारिक यांनी मम्मिक्काचे फोटो आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले आहेत. त्यांनी प्रथम एक फोटो शेअर केला, हा फोटो अभिनेते विनायकन यांच्याशी खूपच मिळता-जुळता आहे. मम्मिक्का यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. त्यानंतर शारिक यांनी पुन्हा फोटोशूटसाठी मम्मिक्का यांचा मेकओव्हर केला. मम्मिक्का यांचा मेकओव्हर करणाऱ्या कलाकाराचे नाव मजनस आहे.