नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कामगार विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीकरिता कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व विभागांनी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नपूर्वक नियोजन करावे. तसेच कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले आहेत.
आज शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कामगार विभागाच्या विभागीय आढावा बैठकीत मंत्री डॉ. खाडे बोलत होते. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव डॉ. विनिता सिंगल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, औद्यगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक मुकेश पाटील, आरोग्य सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या सहसंचालक अंजली आढे, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव दिपक पोकळे, दा.सो.खताळ, कामगार कल्याण आयुक्त र.ग. इळवे, माथाडी सह.आयुक्त विलास बुवा, कामगार उप आयुक्त विकास माळी यांच्यासह विभागातील जिल्ह्यांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणाले की, कामगार विभागाने पोलीस यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने टाकण्यात आलेल्या धाडीत जी बालके आढळतील त्यांना बाल कल्याण समितीकडे हस्तांतरीत करण्यात यावे. तसेच कामगार विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिका व पोलीस यंत्रणा यांची बाल कामगारांबाबत एकत्रितपणे बैठक घेण्यात यावी व बालकामगार विरोधी जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा. विभागात कुठेही बालकामगार आढळणार नाहीत यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करणे गरजेचे आहे. असेही मंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी सांगितले.
वेठबिगारीत आढळून आलेल्या मुलांचे पुनर्वसन करतांना त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यासाठी असलेल्या इतर योजनांचा देखील लाभ देण्यात यावा. याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा. त्याचप्रमाणे किमान वेतनाबाबतच्या प्रलंबित प्रकरणांवर तातडीने कारवाई करून ती निकाली काढण्यात यावीत. कामगार व त्यांच्या पाल्यांना मिळणारे लाभ वेळेत देण्यासाठी कार्यवाही करावी.
नोंदणीकृत कारखाने सध्याच्या काळात सुस्थितीत असल्याची ऑनलाईन खात्री करावी. औद्योगिक क्षेत्रातील ज्या कंपन्यांची नोदंणी झालेली नाही अशा कंपन्यांची नोंदणी तातडीने करण्यात यावी. त्यामुळे कामगारांना अपघात प्रसंगी देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ वेळेत मिळणे शक्य होईल. औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने नियुक्त केलेले डॉक्टर्स यांचा कार्य अहवालही नियमित सादर करण्यात यावा. बाष्पके संचालनालयाने राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. खाडे यांनी दिल्या आहेत.
या आढावा बैठकीत कामगार उपायुक्त कार्यालय, माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, सुरक्षा रक्षक मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालय, बाष्पके संचालनालय व कामगार कल्याण मंडळ यांनी केलेल्या कामांची सादरीकरणाद्वारे संबंधित विभाग प्रमुखांनी माहिती दिली.
Labour Minister on Minimum Wages Company Contractor Action
Dr Suresh Khade Worker Employees