इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गोरगरीब माणसाला रोजच्या जगण्याची भ्रांत असते. कमावलेला पैसा मीठ-भाकरी मिळविण्यासाठी आजच खर्च होतो, त्यामुळे उद्याचे काय? अशी चिंता त्याला सतावत असते. पश्चिम बंगालमधील एका गरीब माणूस देखील असेच आयुष्य जगत होता. त्याच्या खात्यात फक्त दर महिन्याला १७ रुपये जमा होत होते. परंतु एके दिवशी अचानक १०० कोटी रुपये जमा झाले, आणि इतकी रक्कम कुठून आणली याची चौकशी करण्यासाठी त्याच्या घरी सायबर सेलचे अधिकारी नोटीस घेऊन दाखल झाले, तेव्हा तर सर्व कुटुंबाची झोपच उडाली.
पोलिसांचा फोन…
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बासुदेवपूर येथील रहिवासी मोहम्मद नसिरुल्लाह मंडल बंगालमधील रोजंदारीवर काम करणारे मोहम्मद नसिरुल्लाह मंडल यांनीसुद्धा आयुष्याच्या प्रवासात खूप कठीण काळ अनुभवला आहे. घरात गरिबी असल्याने ते अपार कष्ट करतात. मंडल यांच्या खात्यात फक्त १७ रुपये यायचे. परंतु इतर कोणतेही उत्पन्न नसल्याने त्यांनी कधीही आपली शिल्लक तपासण्याचे कष्ट घेतले नाहीत. अचानक एके दिवशी सायबर सेलचे काही अधिकारी त्यांच्या घरी नोटीस घेऊन पोहोचले. त्यांच्या खात्यात चक्क १०० कोटी रुपये जमा झाल्याची माहिती त्या अधिकाऱ्यांकडूनच मंडल यांना मिळाली.
चौकशी होणार
आता सायबर सेलने मंडल यांना नोटीस पाठवून कार्यालयात बोलावले आहे, जिथे खात्यात अचानक पैसे आल्याबद्दल चौकशी केली जाणार आहे. याबाबत मंडल म्हणतात की, पोलिसांचा फोन आल्यानंतर झोपच उडाली आहे. मी काय केले हे मलाही माहीत नाही. अचानक माझ्या खात्यात १०० कोटी रुपये आले आणि खरे सांगायचे तर माझा विश्वासच बसेना.
खाते झाले ब्लॉक
नसिरुल्लाह यांनी आणखी सांगितले की, मी माझे खाते अनेक वेळा तपासले आणि प्रत्येक वेळी मी त्यात १०० कोटी जमा असल्याचे पाहिले, त्यामुळेच मला आश्चर्य वाटले. यानंतरही मी थेट पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) शाखेत धाव घेतली आणि या व्यवहाराची चौकशी केली. बँकेत गेल्यावर त्यांना कळले की, त्यांचे खाते ब्लॉक झाले आहे. ब्लॉक होण्यापूर्वी त्याच्या खात्यात फक्त १७ रुपये होते. मात्र, जेव्हा त्यांनी गुगल पे द्वारे त्याचे खाते तपासले, तेव्हा त्यात जमा केलेली रक्कम मोठी दिसून आली. शेवटी माझ्या खात्यात एवढी मोठी रक्कम आली कुठून काही कळेना?
घरचे रडायला लागले
मी रोजंदारी करणारा मजूर आहे. पोलीस मला पकडून मारतील, या भीतीने मी दिवस घालवला. माझ्या घरीची मंडळी रडायला लागली, आता बँकेने माझे खातेही ब्लॉक केले आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असून, त्यापूर्वी कोणतीही माहिती देता येणार नाही, असे बँक अधिकाऱ्यांनी मंडल यांना सांगितले. हा पैसा कोणाचा आणि त्यावर कोणाचा दावा आहे. या पैशाचे काय करायचे, या सर्वांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतरच मिळू शकतील. मात्र पोलिसांच्या चौकशीत काय उत्तर द्यावे लागणार आहे, याची चिंता सध्या मंडल यांना वाटत आहे.
Labour Bank Account 100 Crore Credited