नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी 1 एप्रिल 2022 रोजी “परीक्षा पे चर्चा” च्या 5 व्या आवृत्तीत जगभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतील. ते म्हणाले की ‘परिक्षा पे चर्चा’ हा बहुप्रतिक्षित वार्षिक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये पंतप्रधान त्यांच्या अनोख्या आकर्षक शैलीत एका थेट प्रक्षेपण कार्यक्रमात विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण आणि संबंधित क्षेत्राशी निगडित प्रश्नांची उत्तरे देतात.
परिक्षा पे चर्चा (PPC) ही एक जनचळवळ असल्याचे वर्णन करताना, श्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोविड-19 साथीच्या आजारातून देशाची पुनर्बांधणी व परीक्षा ऑफलाइन होत असताना या वर्षीच्या PPC च्या महत्त्वावर भर दिला. 21 व्या शतकातील ज्ञान आधारित अर्थव्यवस्था उभारणीत PPC सारख्या उपक्रमांच्या महत्त्वावर भर देताना ते म्हणाले, की PPC ही एक औपचारिक संस्था बनत आहे ज्याद्वारे पंतप्रधान थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. ते म्हणाले की, राज्याच्या राज्यपालांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पाहण्यासाठी देशभरातील निवडक विद्यार्थी राजभवनालाही भेट देतील. देशभरातील राज्य सरकारेही विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सहभागाला प्रोत्साहन देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. श्री प्रधान म्हणाले की, PPC केवळ भारतभरच नाही तर इतर देशांमध्येही प्रवासी भारतीयापर्यंत विस्तारित केला जाईल. या कार्यक्रमाला जनचळवळ बनवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना पाठिंब्याचे आवाहन केले.
तरुणांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘परीक्षा पे चर्चा’ – हा ‘परीक्षा वॉरियर्स’ या मोठ्या चळवळीचा भाग असल्याचे श्री प्रधान यांनी अधोरेखित केले. ही एक अशी चळवळ आहे जी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थी, पालक , शिक्षक व समाजात अशा वातावरणाला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांनी प्रेरित आहे , जिथे प्रत्येक मुलाच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाचा उत्सव साजरा केल्या जातो, त्यांना प्रोत्साहित केले जाते आणि त्यांना स्वतःला संपूर्ण क्षमतेने अभिव्यक्त होण्याची सुविधा दिली जाते.
शिक्षण मंत्री म्हणाले की 5 व्या आवृत्तीचे आयोजन नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे सकाळी 11 पासून टाऊन हॉल इंटरॅक्टिव्ह फॉरमॅट मध्ये होणार आहे. ते म्हणाले कि यात भारतातील आणि विदेशातील कोट्यावधी विद्यार्थी, शिक्षक व पालक भाग घेणार आहेत.
श्री प्रधान पुढे म्हणाले की ज्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांना पंतप्रधान यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे, त्यांची निवड ऑनलाईन सर्जनशील लेखन स्पर्धेतून करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन दिनांक 28 डिसेंबर 2021 ते 3 फेब्रुवारी 2022 दरम्यान MyGov प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात आले होते. या वर्षी सर्जनशील स्पर्धेत 15.7 लाखाहून अधिक स्पर्धकांची नोंदणी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
MyGov वरील स्पर्धेच्या माध्यमातून निवडलेल्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र आणि पंतप्रधान लिखित ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकासह एक विशेष ‘परीक्षा पे चर्चा किट’ दिली जाईल.
हा कार्यक्रम मागील चार वर्षांपासून शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय द्वारे यशस्वीरित्या आयोजित करण्यात येत आहे. PPC च्या सुरुवातीच्या तीन आवृत्त्या नवी दिल्लीतील टाऊन हॉल इंटरॅक्टिव्ह स्वरूपात आयोजित करण्यात आल्या. पंतप्रधान संवाद कार्यक्रमाची पहिली आवृत्ती ”परीक्षा पे चर्चा – 1.0″ ही दिनांक 16 फेब्रुवारी 2018 रोजी आयोजित करण्यात आली होती. शाळा तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत सदर विचार मंथन कार्यक्रमाची दुसरी आवृत्ती “परीक्षा पे चर्चा – 2.0” ही दिनांक 29 जानेवारी 2019 रोजी व तीसरी आवृत्ती ही दिनांक 20 जानेवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आली होती. कोविड-19 महारोगाच्या प्रादुर्भावामुळे चौथी आवृत्ती दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी ऑनलाईन आयोजित करण्यात आली.
शहरातील तोफखाना केंद्रीय विद्यालयात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार असून विद्यालयाने त्यासाठी पूर्ण तयारी केली असल्याची माहिती प्राचार्य देवेंद्र कुमार ओलावत यांनी दिली.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन ( डीडी नॅशनल, डीडी न्यूज, डीडी इंडिया), रेडिओ चॅनल, टीव्ही चॅनल, EduMinOfIndia, नरेंद्र मोदी, PMO India, PIB India च्या युट्यूब चॅनल सह डिजिटल मिडिया, दूरदर्शन नॅशनल, MyGov India, डीडी न्यूज , राज्यसभा टीव्ही, स्वयं प्रभा आदींवर केले जाणार असल्याचे ओलावत यांनी म्हटले.