आदर्श व लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड – छगन भुजबळ
मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व मनमाड शहराच्या माजी नगराध्यक्ष कॉ.कुसुमताई माधवराव गायकवाड यांचे आज वृद्धपकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने एक आदर्श लोकप्रतिनिधी व लढवय्ये महिला नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याच्या शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.
छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, कॉ. कुसुमताई माधवराव गायकवाड यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी पती स्व.कॉ.माधवराव गायकवाड यांच्या सोबतीने आपले संपूर्ण आयुष्य देशहित आणि जनहितासाठी खर्ची केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कलापथकात त्यांनी महत्वपूर्ण काम केले. या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी समाजात जनजागृती करण्याची अतिशय महत्वाची भूमिका बजावली. स्व. माधवराव गायकवाड यांच्या सोबत त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात देखील सहभाग घेऊन लढा दिला. स्व. माधवराव गायकवाड यांच्या विचाराचा वारसा व कार्य त्यांनी नेटाने पुढे नेला.
कॉ.कुसुमताई गायकवाड यांनी मनमाड शहराचे नगराध्यक्षपद भूषविले. मनमाड शहराच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. आपल्या अलौकिक कार्यातून त्यांनी अनेक चवळीचे कार्यकर्ते घडविले. त्यांच्या निधनाने नाशिक जिल्हा एका आदर्श लढवय्या महिला नेतृत्वाला कायमचा मुकला आहे. मी व माझे कुटुंबीय गायकवाड कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.