नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाचाल तर वाचाल या उक्तीला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लोकांना वाचनाभिमुख करण्याच्या कार्यात सदैव तत्पर रहाण्याचा विडा कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे विनायक रानडे यांनी उचलला आणि देश-विदेशात जगाच्या काना -कोपऱ्यात २००० पेक्षा अधिक ग्रंथ पेट्यांतून तीन करोड रुपयांची ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध होत आहे
सम्राट ग्रुप ‘अपना घर’
ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमा अंतर्गत शनिवारी सातपूर येथे सम्राट ग्रुप ‘अपना घर’ कॉलॉनती ग्रंथ पेटीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायकजी रानडे होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे नाशिक अध्यक्ष विजय हाके, लेखिका संगीता ठाकूर चव्हाण आणि अभिनेत्री पूनम देशमुख , सम्राट ग्रुप चे सर्वे सर्वा अविनाश आव्हाड कार्यक्रम समयी उपस्थित होते. सम्राट ग्रुपने १४६० घरांची ही कॉलनी विकसित केली आहे. इथे ‘ग्रंथ पेटी’ चे वितरण व्हावे , लोकांना वाचनासाठी प्रवृत्त करावे म्हणून स्वतः सम्राट ग्रुप ने एक ग्रंथ पेटी प्रायोजित करून हा उपक्रम सुरू केला ही अतिशय कैतुकास्पद बाब आहे. १३ वर्ष झाले ग्रंथ पेटी चा उपक्रम सुरू होऊन आणि कशाप्रकारे ग्रंथ पेटीची घौड दौड चालू आहे हे विनायक रानडेंनी सांगितले.
साई महिला मंडळ
ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमा अंतर्गत रविवारी शिवकॉलनी सेवाभावी संस्थेचे साई महिला मंडळ येथे विनायकजी रानडेंच्या हस्ते ग्रंथ पेटीचे वितरण झाले. संस्थापिका सौ माई बुचके ह्यांच्या कडे पेटी सुपूर्द करण्यात आली. ग्रंथ पेटीचे काम सौ. अर्चना कुलकर्णी बघणार आहेत. संस्थापिका माई बुचके ह्यांनी महिलांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत.परिसरातील सर्व महिलांना ह्याचा फायदा नक्की होणार आहे. ह्या ग्रंथ पेटी वितरण सोहोळया प्रसंगी जेष्ठ नाट्य समीक्षक एन. सी. देशपांडे उपस्थित होते. त्यांचे मार्गदर्शन आणि मोलाचे बोल, तसेच विनायक रानडे यांचे मार्गदर्शन आणि उपस्थित लेखिका संगीता ठाकूर चव्हाण ह्यांचे मार्गदर्शन महिलांना झाले. विनायक रानडे यांनी ग्रंथ तुमच्या दारी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा फायदा नाशिक आणि जगाच्या काना कोपऱ्यातील जास्तीतजास्त वाचकांनी घ्यावा असे आवाहन केले.