नाशिकः सर्जनशील साहित्य निर्मितीसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या एक लक्ष रूपये मूल्याच्या कुसुमाग्रज अभ्यासवृत्तीसाठी अविनाश कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे, असे निवेदन अभ्यासवृत्ती समितीप्रमुख प्रा हर्षवर्धन कडेपूरकर यांनी प्रसिध्दीस दिले आहे. मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलेल्या अविनाश कोल्हे यांनी कथा व कादंबरी लेखनातून त्यांची सर्जनशीलता यापूर्वीच सिध्द केलेली आहे. कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या सर्जनशील साहित्य निर्मितीला बळकटी प्राप्त होणार आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने वर्षातून एकदा देण्यात येणाऱ्या या अभ्यासवृत्तीचे यापूर्वीचे मानकरी होते: मुरलीधर खैरनार, अवधूत डोंगरे, प्रणव सखदेव, गजानन तायडे, ऋषीकेश पाळंदे आणि पंकज भोसले. यातील काहींच्या साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत व काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. हे सर्व लेखक मराठी भाषेतील आजचे आघाडीचे लेखक आहेत. यावर्षीच्या निवड प्रक्रियेत प्रतिष्ठानचे सल्लागार हेमंत टकले, विलास लोणारी, लोकेश शेवडे, अभ्यासक्रम समिती प्रमुख हर्षवर्धन कडेपूरकर, विश्वस्त अजय निकम व राजेंद्र डोखळे आणि कार्यवाह मकरंद हिंगणे यांचा सहभाग होता. कार्यालय प्रमुख रामदास जगताप व त्यांचे सहकारी यांचेही यासाठी सहाय्य लाभले.