इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नौरंगिया येथे लग्नाच्या एका विधीसाठी (मडकोड) गेलेल्या किशोरवयीन मुलींसह लहान मुले परतताना विहिरीत पडल्या. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात रात्री एकच गर्दी उसळल्याने पीडितांचे नाव आणि पत्ता नोंदवता आले नाहीत. सर्व मृतदेह शवागारात पाठवण्यात आले आहेत. जखमींना नौरंगिया प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. येथील नेबुआ नौरंगिया पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नौरंगियाच्या स्कूल टोला येथील रहिवासी परमेश्वर कुशवाहा यांच्या मुलाचे गुरुवारी लग्न आहे. हळद लावण्याच्या कार्यक्रमादरम्यान काही महिला मटकोरा हा विधी करण्यासाठी गावात गेल्या होत्या. त्यांच्यासोबत मुलेही होते. महिला आणि मुली नृत्य आणि गाणी म्हणत परतत होत्या. लहान मुलेसुद्धा सोबत होते. गावात येण्याचा रस्ता खूपच अरूंद आहे. रस्त्याच्या काठावर एक खोल विहीर आहे. त्यावर वीस वर्षांपूर्वी स्लॅब टाकला होता. जागा न मिळाल्याने काही महिला आणि मुले विहिरीवर चढले. त्याचवेळी स्लॅब अचानक कोसळला. त्यात अनेक ग्रामस्थ विहिरीत पडले. माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने विहिरीत वीजपंप लावला. पाणी उपसण्यासह विहिरीत पडलेल्या ग्रामस्थांना काढण्यास सुरुवात झाली. विहिरीत २३ ग्रामस्थ पडले होते. सर्वांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी १३ जणांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. ते सर्व १३ जणांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. रुग्णालयात इतकी गर्दी उसळली होती की, मृतांची ओळख पटविल्याविना मृतदेह शवागरात पाठवण्यात आले.
पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांना शोक
कुशीनगर येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पीडितांच्या कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त करत त्यांनी जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा कुशीनगर दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य संचालित करण्याचे तसेच जखमींना योग्य उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जिल्हाधिकारी रामलिंगम यांनी जाहीर केली आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1494126421438267394?s=20&t=wA7pZfIyi2YpUqK54gzVLA
मृतांची नावे
परी (१, मुलगी, राजेश चौरसिया), आरती (१०, मुलगी, इंद्रजीत चौरसिया), शशिकला (१५, मुलगी, मोहन चौरसिया), पूजा (१५, मुलगी बलवंत यादव), सुंदरी (१५, मुलगी प्रमोद कुशवाहा), ज्योती (१५, मुलगी, रामबराई चौरसिया), राधिका (१६, मुलगी महेश कुशवाहा), पूजा (२०, मुलगी रामबराई चौरसिया), मीरा (२५, मुलगी सुग्रीव विश्वकर्मा), शकुंतला देवी (३५, पत्नी, भोला चौरसिया), ममता देवी (३५, पत्नी, रमेश चौरसिया) दोन मृतदेहांची ओळख पटलेली नाही.