नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कवितेचे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या मनमाड येथील कुंदलगाव येथे महाराष्ट्रातील दिग्गज व प्रसिध्द कविंचे संमेलन ६ व ७ डिसेंबर रोजी संपन्न झाले. या संमेलनाला समकालीन मराठी कविता..चर्चासत्र असे नाव देण्यात आले होते. मनमाड येथील डॅा. म.सु. पाटील विचार मंचाने या कार्यक्रमाचे आयोजन केले. या चर्चासत्राचे नियोजन प्रसिध्द कवी व सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी देवीदास चौधरी व कवी प्रकाश होळकर यांनी केले.
या चर्चासत्रात प्रसिध्द कवी वसंत डहाके यांनी आशया इतकीच कवितेची संरचना महत्वाची असल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, काहीवेळा कवितेच्या आशयाकडे जास्त लक्ष दिले जाते, आशय हाच महत्वाचा समजला जातो आणि कवितेच्या संरचने कडे मात्र दुर्लक्ष केले जाते, हे योग्य नसून आशया इतकीच कवितेची संरचना महत्वाची असते. प्रत्येक काळात कवी या संरचनेत नव नवे प्रयोग करत असतो असे सांगत त्यांनी आपल्या बीज भाषणात मराठी समकालीन कवितेची स्थिती आणि गतीची चर्चा केली. यावेळी त्यांनी कवितेच्या विविध अंगांची आणि बदलत गेलेल्या रूपांचीही मांडणी केली.
दोन दिवसाच्या या चर्चासत्रात समकालीन मराठी कविता – स्थिती आणि गती, समकालीन मराठी कवितेतील आशय व जीवनसृष्टी, समकालीन कवितेचे पवित्रे, समकालीन कवितेवरील इलेक्टॅानिक्स मीडिया आणि इंटरनेटचा प्रभाव, समकालीन मराठी कवितेतील भाषेचे नवे प्रयोग व नवकाव्य संकेतनिर्मिती, समकालीन मराठी कवितेतील सामाजिक प्रतिबध्दता, उत्तर आधुनिकेतेचा प्रभाव व कविता आणि जीवनसृष्टी, समकाली कविता आणि समीक्षा यावर चर्चा झाली.
या चर्चा सत्रात एकनाथ पगार (देवळा) अरूण ठोके (नाशिक) नीरजा, गणेश कनाटे, सुनंदा भोसेकर, दिनकर मनवर (मुंबई) मंगेश नारायणराव काळे (पुणे) संतोष पद्माकर पवार (मंचर) मनोज सुरेंद्र पाठक, दा.गो.काळे (शेगाव) मंगेश घोडके, सुनील उबाळे (औरंगाबाद) इत्यादी कवी,लेखकांचा सहभाग होता.
दोन दिवस चाललेल्या या चर्चा सत्रात समकालीन मराठी कविता, स्थिती आणि गती, स्त्री लिखित कवितेचा गेल्या अर्धदशकातील प्रवास,बदलत गेलेले रूप,प्रायोगिक रूप,बदलते संवेदन…अशी एकूणच स्त्री संवेदने. समीक्षेच्या मर्यादा, शक्तीस्थळे, अभाव..किंवा नव्याने समोर आलेल्या व्यासपीठावरून ( फेसबुक, व्हॉट्स ॲप) येणारी कविता, तिचे स्वरूप, जागतिकीकरण, समकालीन मराठी कवितेचे पवित्रे, उत्तर आधुनिकता, अशा विविध अंगांनी ही चर्चा .
या चर्चा सत्राचा समारोप ज्येष्ठ कवी,अभ्यासक प्रभा गणोरकर यांच्या भाषणाने झाला. या सत्रात मांडले गेलेले विचार,त्यावर झालेली चर्चा या अनुषगाने त्यांनी त्यांची निरीक्षणे नोंदविली.
कवितेचा गजर आता महाराष्ट्रात
डॅा. म. सु. पाटील हे प्रदीर्घ काळ मनमाड महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. या काळात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कवी नेहमी मनमाड येत असत. त्यामुळे हे गाव कवितेचे जंक्शन म्हणून ओळखले जाते. त्याच गावाजवळ असलेल्या कुंदलगाव येथे त्यांचे विद्यार्थी देवीदास चौधरी यांनी या मोठ्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. डॉ.म. सु. पाटील यांच्या स्मृती जपण्याबरोबरच कवितेचा गजर आता महाराष्ट्रात या दिग्गज कवींच्या संमेनलातून करण्यात आला. या विचार मंचाची स्थापना गेल्या पाच वर्षपूर्वी करण्यात आली असून आतापर्यंत अनेक साहित्यिक उपक्रम राबविले आहेत.