येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला विधानसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीतर्फे ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला देण्यात आली. त्यात माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर कुणाल दराडे यांनी हा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज भरतांना त्यांनी समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात ते म्हणाले की पवार-ठाकरेंची इच्छा असूनही उमेदवारीपासून वंचित राहिलो. पण, जरांगे पाटलांनी पाठिंबा दर्शविल्यास उमेदवारी करणार असेही ते म्हणाले.
या मेळाव्यात बोलतांना दराडे म्हणाले की, सगळ्या सर्व्हेत मी टॉपला होतो किंबहुना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शेवटच्या मिनिटापर्यंतच्या मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. मात्र सामाजिक समीकरणांमुळे मी उमेदवारी पासून वंचित राहिलो असे स्पष्ट करत जरांगे पाटलांनी पाठिंबा दर्शविल्यास अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी जाहीर केले.
संवाद मेळाव्याला प्रचंड गर्दी व समर्थन पाहून पाहून भावूक झालेल्या दराडेना अश्रू अनावर झाले. समर्थकांच्या आग्रहाखातर दराडे परिवाराने अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब जगताप अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, काँग्रेसचे सचिन होळकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख जगन आहेर, शिवा सुराशे, शहरप्रमुख संजय कासार,युवाचे जिल्हाप्रमुख सुयोग गायकवाड,तालुकाप्रमुख सुनीता शिंदे, नितीन काबरा,माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, एजाज शेख,सुधीर जाधव आदी शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
मागील चार वर्षापासून मतदारसंघात प्रामाणिकपणे जनतेची सेवा मी केली. प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडविल्या किंबहुना दोन्ही आमदारांच्या माध्यमातून कोट्यावधीची विकासकामे देखील केली.यावेळी ओबीसी विरुद्ध ओबीसी असे समीकरण होऊन भुजबळांचा पराभव निश्चित झाला असता किंबहुना जागा वाटपाच्या घडामोडीतही शरद पवार,उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे,संजय राऊत,रोहित पवार हे सर्व प्रमुख नेते माझ्या नावासाठी शेवटचा मिनिटापर्यंत आग्रही होते. मात्र तिसरा उमेदवार होण्याची शक्यता असल्याने नाईलाजाने मला उमेदवारी पासून वंचित राहावे लागल्याचा खुलासा दराडे यांनी केला.
मतदारसंघात आजही मराठा व ओबीसी बांधव माझ्यासोबत असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दर्शविल्यास उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.दराडे परिवार कधीही पडण्यासाठी उमेदवारी करत नाही.त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेऊ मात्र जनतेची सेवा अव्याहतपणे करत राहू असे आमदार किशोर दराडे यांनी सांगितले.यावेळी अनेक समर्थकांनी मनोगत व्यक्त करत उमेदवारी करण्याचा आग्रह धरला. दरम्यान,कुणाल दराडे यांनी माजी नगराध्यक्ष रामदास दराडे,सचिन होळकर,भास्कर कोंढरे, मकरंद तक्ते यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.